मुंबई नगरी टीम
मुंबई । राज्यातील शिंदे सरकारचा रखडलेला विस्तार,विलंबाने झालेले खाते वाटप,मंत्री मंडळात समावेश केलेले वादग्रस्त मंत्री आणि अतिवृष्टीमुळे शेतक-यांची झालेली दैना या पार्श्वभूमीवर उद्या मंगळवारपासून सुरू होणारे शिंदे सरकारचे पहिले पावसाळी अधिवेशन चांगलेच गाजण्याची शक्यता आहे.अतिवृष्टीमुळे झालेले शेतीचे नुकसान,राज्यातील पूरपरिस्थिती,ठाकरे सरकारच्या कामांना दिलेली स्थगिती,भंडारा सामूहिक बलात्कार प्रकरण आदी प्रश्नी विरोधक सत्ताधा-यांना कोंडीत पकडण्याची शक्यता आहे.
राज्यातील शिंदे सरकार उद्यापासून सुरू होणा-या पहिल्या पावसाळी अघिवेशनाला सामोरे जाणार आहे.पावसाळी अधिवेशन केवळ सहा दिवस चालणार असल्याने अधिवेशनाच्या कालावधीवरूनही विरोधक सत्ताधा-यांना कोंडीत पकडण्याची संधी सोडणार नाहीत.एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी होवूनही मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यास लागलेला अवधी आणि खाते वाटपास झालेला विलंब यावरूनही विरोधक सत्ताधा-यांवर कुरघोडी करण्याची शक्यता आहे.एकीकडे खाते वाटपामुळे नाराज झालेले मंत्री तर शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळा प्रकरणी अडचणीत सापडलेले मंत्री अब्दुल सत्तार आणि पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी राजीनामा द्यावा लागलेले मंत्री संजय राठोड यांचा पुन्हा मंत्रिमंडळात समावेश केल्याने विरोधक हा मुद्दा उपस्थित करीत सरकारचा घेरण्याचा प्रयत्न करू शकतात. एनडीआरएफ निकषांच्या दुप्पट मदत करण्याची केलेली घोषणा,बुलेट ट्रेन प्रकल्प, आरे कारशेड,केवळ ४० दिवसात ७५० शासन निर्णय जारी करण्यात आलेले प्रकरण, नगराध्यक्ष व सरपंच यांची निवड थेट जनतेमधून करण्याचा घेतलेला निर्णय आणि राज्यातील कायदा सुव्यवस्था आदी मुद्दे चांगलेत गाजण्याची शक्यता आहे.भंडारा सामूहिक बलात्कार प्रकरणीही विरोधक सत्ताधा-यांना कोंडीत पकडण्याची शक्यता आहे.
सहा दिवसांच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांकडे सत्ताधाऱ्यांवर तुटून पडण्यासाठी अनेक मुद्दे असले तरी काल विरोधी पक्षात असलेले सत्ताधारी तेल लावलेले पैलवान असल्याने शिंदे सरकारचे पहिले पावसाळी अधिवेशन चांगलेच गाजणार आहे.विरोधकांच्या प्रश्नांच्या मा-याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यंमंत्री देवेंद्र फडणवीस सक्षम असले तरी सध्या भाजप आणि शिंदे गट एकत्रित असल्याने सभागृहात सामना रंगण्याची शक्यता आहे. विधान परिषद विरोधी पक्षनेता निवडताना शिवसेनेने मित्र पक्षांना विश्वासात घेतले नसल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेवर नाराज आहे.अशा परिस्थितीत शिवसेनेचे आमदार शिंदे गटावर कशा प्रकारे हल्लाबोल करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.काही ठिकाणी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट आले आहे.सरकारने जाहीर केलेली मदत तुटपुंजी असल्याने विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे.एकूणच शेतक-यांच्या प्रश्नावर विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहे.शिवसेना फुटी प्रकरणी सर्वोच न्यायालयात सुनावणी सुरू आहे. अद्याप त्यावर निर्णय झालेला नाही.अशा परिस्थितीत उद्यापासून पावसाळी अधिवशनाला सुरुवात होत आहे.