ममता बॅनर्जींना सत्तेसाठी ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा करावा लागला नाही
उध्दव ठाकरे यांचा भाजपला टोला
मुंबई दि.४ २५ वर्षे असणारी लालभाईंची सत्ता उलथवून टाकणा-या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना यासाठी ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा करावा लागला नाही व पैशांनी मते विकत घ्यावी लागली नाहीत, असा टोला शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी सामनाच्या संपादकीयमधून भाजपला हाणला आहे.
केंद्रातील मोदी सरकारला आणि भाजपला वारंवार लक्ष्य करणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची परवा भेट झाली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. मित्रपक्ष भाजपानेही शिवसेनेवर ममता भेटीबाबत टीका केली आहे. यावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर पलटवार केला आहे.
ममता बॅनर्जी यांना भेटताच आमच्याच मित्रवर्यांची राजकीय आतडी वळवळू लागली व आम्ही ममतांना भेटून मोठेच पाप केले असे ते सांगू लागले. ज्वलंत हिंदुत्वाचे तथाकथित राखणदार मुस्लिमधार्जिण्या ममतांच्या वळचणीला गेल्याची बोंब या मंडळींनी ठोकली, अशा शब्दांत ठाकरे यांनी भाजपचा समाचार घेतला आहे. शिवाय, २५ वर्षे रुजलेली लालभाईंची राजवट उलथवून टाकण्याचे काम या वाघिणीने केले. त्यासाठी तिला ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा करावा लागला नाही व पैशांनी मते विकत घ्यावी लागली नाहीत, असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.