यापुढे हात सोडायला लावू नका !
राज ठाकरे यांचा प्रशासनाला गंभीर इशारा
मुंबई दि.४ येत्या दोन दिवसात उच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रत प्रत्येक पोलीस ठाणे, वाॅर्ड ऑफिसर आणि रेल्वे स्टेशन मास्तरला देवून फेरीवाल्यावर कारवाई करण्याची मागणी मनसेचे पदाधिकारी करणार असून, त्यांनी कारवाई न केल्यास संबंधित अधिका-यावर न्यायालयाच्या अवमानाची केस दाखल करू , त्यानंतरही फेरीवाले दिसल्यास यापुढे” जोडलेले हात सोडायला लावू नका” असा गंभीर इशारा मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दिला आहे.
आज रंगशारदा येथे झालेल्या पदाधिकारी मेळाव्यात आपली भूमिका मांडताना फेरीवाल्यांची बाजू घेणा-या अभिनेते नाना पाटेकर यांचा राज ठाकरे यांनी खरपूस समाचार घेतला. त्यांची नक्कल करत त्यांनी नानावर टीका केली. नाही त्या गोष्टीत चोंबडेगिरी करू नये.माहिती नाही त्या गोष्टी नानाने करू नये , पाण्याचा प्रश्न सरकारने सोडवायचा मग नानाने संस्था का काढली. रस्त्यावर काय करायचे हे त्याने सांगू नये. मराठी सिनेमांना थिएटर मिळत नव्हते तेव्हा हा नाना कुठे होता अशा शब्दात राज ठाकरे यांनी नानावर टीका केली.
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात संजय निरूपम यांचाही समाचार घेतला. फेरीवाल्याकडून प्रशासनाला दरवर्षी २ हजार कोटीचा हप्ता मिळतो असा गौप्यस्फोटही राज ठाकरे यांनी केला. येत्या दोन दिवसात मनसेचे पदाधिकारी उच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत आणि राज ठाकरे यांचे पत्र प्रत्येक रेल्वे स्टेशनचे मास्तर, पोलीस आणि वाॅर्ड ऑफिसर यांना देवून याची अंमलबजावणी करण्याची मागणी करणार आहेत.त्यानंतरही याची अंमलबजावणी न झाल्यास संबंधितांवर न्यायालयाच्या अवमानाची केस दाखल करू असे स्पष्ट करीत , एवढे करूनही या परिसरात फेरीवाले दिसल्यास ” जोडलेले हात यापुढे सोडायला लावू नका “असा खणखणीत इशारा राज ठाकरे यांनी यावेळी दिला.