मी शिक्षणमंत्री आहे, शिक्षकमंत्री नाही
विनोद तावडे
पुणे दि.५ मी राज्याचा शिक्षणमंत्री आहे, शिक्षक मंत्री नाही. वेतनवाढ हवी असेल तर विद्यार्थ्यांची गुणवत्ता सिद्ध करावीच लागेल, असे बोलल्यामुळे माझ्या विरोधात गेले काही दिवस शिक्षकांचे मोर्चे निघत आहेत. मात्र, वेतन आयोग, वेतन वाढ याआधी शिक्षणासंदर्भातील निर्णयांना आधी प्राधान्य दिले जाईल’, अशी स्पष्टोक्ती शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज पुण्यात झालेल्या एक कार्यक्रमात दिली.
जागतिक रंगभूमी दिनानिमित्त ज्येष्ठ नेपथ्यककार बाबा पारसेकर यांना नटवर्य प्रभाकर पणशीकर जीवनगौरव पुरस्कार तर ज्येष्ठ अभिनेत्री निर्मला गोगटे यांना किर्लोस्कर संगीत रंगभूमी पुरस्कार जाहीर झाल्याची घोषणा यावेळी तावडे यांनी केली.
शिक्षणमंत्री तावडे म्हणाले, ‘काय बोलायचे आणि काय बोलायचे नाही हे कळत असल्याने मुख्यमंत्र्यानी मला सांस्कृतिक आणि शिक्षण मंत्री म्हणून जबाबदारी सोपवली आहे. तरीही सगळ्यांना तावडेंचे वावडे आहे.’
मतदार नोंदणी, विद्यार्थ्यांचे आधार कार्ड बनवून देणे, शाळेत विविध दिवस साजरे करून त्याचे अहवाल पाठविणे यापासून ते आता थेट शौचालयांची पाहणी करण्यापर्यंतच्या अशैक्षणिक कामांचा व्याप वाढत असल्याने राज्यभरातील शिक्षक काल उत्स्फूर्तपणे रस्त्यांवर उतरले होते.प्रत्येक जिल्ह्यात शिक्षक उत्स्फूर्तपणे रस्त्यांवर उतरले आणि त्यांनी राज्य सरकारच्या निषेधाच्या जोरदार घोषणा देत ‘आम्हाला फक्त शिकवू द्या,’ असा नारा दिला.