राष्ट्रवादीच्या ” सेल्फी विथ खड्डामुळे” खड्डे बुजवण्याच्या कामाला वेग
मुंबई दि.५ येत्या १५ डिसेंबरपर्यंत राज्यात एकही खड्डा दिसणार नाही, असा दावा राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी केल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विविध ठिकाणच्या रस्त्यावरील खड्ड्यासोबत सेल्फी काढून सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांना ट्विटरद्वारे पाठवल्यानंतर राज्यातील प्रमुख शहरातील डागडूजीला चांगलाच वेग आला आहे.
खड्ड्यांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवर सेल्फी विथ खड्डा ही मोहीम सुरू केल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे माजी मंत्री शशिकांत शिंदे यांच्यासह राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांनी आपल्या मतदार संघातील रस्त्यांची अवस्था ट्विटरच्या माध्यमातून पाटील यांच्यापर्यंत पोहचवली होतो. विविध भागातील रस्त्यावरील खड्डे बुजवल्याचे फोटो शेअर करून सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी या नेत्यांना उत्तर दिले आहे.पाटील यांनी ट्विटरद्वारे दिलेल्या उत्तरात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे काम वेगात सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे. याचा पुरावा म्हणून त्यांनी खड्डे बुजवण्याच्या कामाचे अनेक फोटोही शेअर केले आहेत.
तासगाव, बहादुरी, येवला, नांदगाव, पिलखोड, बहल या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याच्या कामाचे हे फोटो आहेत. १५ डिसेंबरपर्यंत राज्यात एकही खड्डा दिसणार नाही, असा दावा सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.