क्या हुआ तेरा वादा ! मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी वाजले गाणे
नागपूर दि.५ गेल्या विधानसभा निवडणूकीत दिलेल्या धनगर आरक्षणाच्या आश्वासनावरून सत्ताधा-यांना रोषाला सामोरे जावे लागत असताना आज त्याचा प्रत्यय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आपल्याच घरच्या मैदानावर आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या धनगर समाजाच्या मेळाव्याला हजेरी लावली. या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरु झाले, तेव्हा चक्क ” क्या हुआ तेरा वादे” हे गाणे वाजू लागल्याने मुख्यमंत्र्यांची पंचाईत झाली. मात्र आपण आरक्षणाचा शब्द विसरलो नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिल्याने पुढील भाषण शांततेत पार पडले.
धनगर समाजाच्या आरक्षणाच्या आश्वासनाची आठवण करुन देण्यासाठी धनगर समाजातल्या काही कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणा वेळी हे गाणे वाजवले. या गाण्यांच्या दरम्यान एक-एक ओळीचा तपशील सुद्धा होता. ज्यातून मुख्यमंत्र्यांनी सत्तेत आल्यानंतर वेगवेगळ्या काळात काय-काय शब्द दिले होते याची त्यांना आठवण करुन देण्यात आली.” क्या हुआ तेरा वादा” हे गाणे वाजवून झाल्यानंतर आपण आरक्षणाचा शब्द विसरलो नसल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिले. आघाडी सरकारच्या चुकीमुळे धनगर आरक्षण रखडले अशी टीका करत ,मात्र आम्ही नव्याने अहवाल तयार करुन केंद्राकडे पाठवणार आहोत. पुढच्या महिन्यात त्याचा अहवाल येईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकरांचे नाव
सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे नाव देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज झालेल्या धनगर समाजाच्या मेळाव्यात केली. अनेक दिवसांपासून सोलापूर विद्यापीठाच्या नामांतराचा वाद सुरु होता.विद्यापीठाला अहिल्याबाई होळकरांचे नाव दिले जावे, असा एका समुहाचा आग्रह होता. तर दुसऱ्या बाजूला विद्यापीठाला महात्मा बसवेश्वर यांचे नाव दिले जावे, अशीही मागणी होत होती. मात्र आज अहिल्याबाई होळकरांचे नाव देण्याचा घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.
महादेव जानकर यांच्या लढ्याला यश
२००५ मध्ये राष्ट्रीय समाज पक्षानचे अध्यक्ष महादेव जानकरांच्या नेतृत्वात सोलापुर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्यासाठी महामोर्चा काढण्यात होता. १९९९ साली दिल्लीत धनगर आरक्षणासाठी पहिला मोर्चा महादेव जानकरांनी काढला होता. जानकर आज सत्तेत असले तरी ह्या मागण्यांसाठी असलेला त्यांचा हट्ट आजही कायम आहे. आज नागपूर मध्ये धनगर आरक्षण निर्णायक मेळाव्याला संबोधित करताना त्यांनी या मागण्यांचा पुन्हा उल्लेख केला आणि मुख्यमंत्र्यांनी आजच सोलापुर विद्यापीठाला अहिल्यादेवी होळकर यांचे नाव देण्याची घोषणा केली.