मुंबई नगरी टीम
मुंबई । प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू हे माझ्या एका फोनवर गुवाहटीला गेले.मी स्वत : त्यांना फोन केला होता.आम्हाला सरकार स्थापन करायचे असल्याने तुम्ही आमच्यासोबत हवे आहात त्यामुळे तुम्ही आमच्या गटात यावे अशी विनंती मी त्यांना केल्याचा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.
अपक्ष आमदार रवी राणा आणि प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांच्यातील आरोपप्रत्यारोपाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्यातील वाद संपुष्टात आणला.मात्र आज झालेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी बच्चू कडू यांच्याबाबत एक मोठा खुलासा करून खळबळ उडवून दिली. सत्तांसंघर्षावेळी बच्चू कडू यांना मी स्वत : फोन करून त्यांना गुवाहटीला जाण्यास सांगितल्याचा गौप्यस्फोट त्यांनी आज केला.बच्चू कडू यांना मी फोन केला आणि आम्हाला सरकार बनवायचे असल्याने तुम्ही आमच्यासोबत हवे आहात आणि तुम्ही आमच्या गटात यावे अशी विनंती मी बच्चू कडू यांना करताच ते गुवाहटीला गेले.त्यामुळे त्यांच्यावर सौका केल्याचा आरोप करणे योग्य नाही असे फडणवीस म्हणाले.४० आमदार गुवाहटीला गेले ते एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून गेले.उद्या आमदारांची आवश्यक संख्या झाली नाही तर त्यांचे पद जाईल यांची जाणीव त्यांना होती.मात्र त्यांचा एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास असल्यानेच ते गुवाहटीला गेले असे सांगतानाच केवळ बच्चू कडू हे माझ्या एका फोनवर गुवाहटीला गेले बाकीचे माझ्या फोनवर गेले नाहीत,असेही फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.
रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर केलेल्या आरोपासंदर्भात दिलगिरी व्यक्त केली असल्याने हा विषय संपला असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.बच्चू कडू यांच्यावर केलेले आरोप हे रागारागत केल्याचे राणा यांनी सांगितल्याचेही यावेळी फडणवीस म्हणाले.यापुढे दोघांनी विकासासाठी काम करायचे ठरवले असल्याचेही फडणवीस यावेळी म्हणाले.