भाजप सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी
काॅग्रेसची टीका
उस्मानाबाद , दि ५ राज्य सरकारला ३ वर्ष झाली आहेत या काळात हे सरकार सर्व आघाड्यावर अपयशी ठरले आहे. भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे देशात जीव जगणे महाग झाले असून फक्त मरण स्वस्त झाले असल्याची बोचरी टीका काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश यांनी केली. या सरकारच्या चुकीच्या धोरणा विरोधात काँग्रेस कमिटीने जनआक्रोश सप्ताहाचे आयोजन केले आहे. उस्मानाबाद येथे आयोजित या तिसऱ्या मेळाव्यात मोहन प्रकाश बोलत होते यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री पतंगराव कदम, हर्षवर्धन पाटील, मधुकर चव्हाण, बसवराज पाटील, अमित देशमुख, शैलेश चाकूरकर यांच्यासह इतर प्रमुख नेते पदाधिकारी लोकप्रतिनिधी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पंतप्रधान मोदी परदेशी शक्तीच्या इशाऱ्यावर नोटबंदी, जिएसटी यासारखे उपक्रम राबवित देशाला आर्थिक संकटात आणत आहेत. गेल्या सडे तीन वर्षाच्या काळात सरकारने सामान्य लोकांना दिलासा देणारा एकही निर्णय घेतला नाही कर रूपाने दिलेले साडे सहा लाख कोटी रुपये उद्योगपती मित्रांना वाटले. शहा आणि तानाशहाची जोडी देशाला लुटण्याचे काम करीत आहे अशी टीका प्रकाश यांनी केली. श्रावण महिन्यात जन्मलेले भाद्रपद महिन्याचा पाऊस पाहूनच सांगतात कि इतका पाऊस जन्मात कधी पहिला नाही अश्या शब्दात प्रकाश यांनी भाजपाची खिल्ली उडवली .
महाराष्ट्र कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनीही राज्य सरकारवर सडकून टीका केली. दारूच्या बाटलीला महिलेचे नाव द्या म्हणजे दारुचा खप वाढेल अश्या पद्धतीचे वक्तव्य सरकारमधील मंत्री जर करीत असतील तर त्यांच्या अकलेची किव येत असल्याची टीका चव्हाण यांनी केली. भाजपची धोरणे शेतकरी विरोधी असून शेतीमालाला हमीभाव मिळत नाही. भाजपने सर्व घटकांची फसवणूक केली असून या कोडग्या सरकारला त्याची जागा दाखवण्यासाठी व लोकांचा संताप सरकारपर्यंत पाहोचवण्यासाठी हे जन आक्रोश आंदोलन असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
मराठवाड्यातील सर्व उद्योग धंदे व प्रकल्प मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरकडे पळवल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. केवळ मराठवाड्याबाबतच नाही तर कोकणातील स्तिथीही सारखीच असून मुख्यमंत्री पश्चिम महाराष्ट्राबाबत आकसाने वागत असल्याचे चव्हाण म्हणाले. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बँकांचे राष्ट्रीकरण करून सर्वासाठी बँकेची दालने खुली केली तर नरेंद्र मोदी हे बँक मूठभर उद्योगपतीसाठी खुल्या करीत आहेत .
यावेळी बोलताना विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनीही राज्य सरकारच्या कारभाराचा पंचनामा केला. राज्यात फक्त घोषणा करणारे कृती शून्य सरकार असून आई भवानीच्या आशिर्वाद घेऊन आम्ही या सरकारविरोधात संघर्ष सुरु केला आहे या सरकारला पायउतार केल्याशिवाय राहणार नाही असे विरोधीपक्षनेते म्हणाले.