मुंबई नगरी टीम
बुलढाणा । शिवसेनेने राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारवर खोके सरकार अशी केलेली टीका चांगलीच गाजत असतानाच आता त्याचे पडसाद सध्या देशात चर्चेत असलेल्या राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत उमटले आहेत.राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आज शेगावला पोहोचली. त्या आधी या यात्रेत युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही यांच्या हातात एक बॅनर होता.त्यावर पेटीएमच्या धर्तीवर पेसीएम असे लिहिले होते.त्या बॅनर ५० खोके एकदम ओके असाही मजकूर होता.राहुल गांधी आणि नाना पटोले यांनीही हा बॅनर हाती धरला होता.राहुल गांधी यांनी यावरील मजकूर कुतूहलाने पाहिला.
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर अधिवेशन काळात शिंदे फडणवीस सरकारवर विरोधकांनी ५० खोके एकदम ओके अशी टीका केली होती.विरोधकांची ही घोषणा चांगलीच गाजली.शिंदे गटातील आमदारांच्या मतदार संघातही अशा घोषणा देण्यात आल्या.आता तर संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत याचे पडसाद पहायला मिळाले.भारत जोडो यात्रा आज शेगाव मध्ये पोहचली.बुलढाण्यादरम्यान या यात्रेत एक बॅनर लक्ष वेधून घेत होता.युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी ‘पेसीएम’चा बॅनर हाती घेतला होता.या बॅनरवर क्यूआर कोड आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोटो होता. मुख्यमंत्र्यांना भ्रष्टाचार करता यावा याठी हा क्यूआर स्कॅन करा, असा मजकूर क्यूआर कोडच्या खाली आहे असून यावर ५० खोके एकदम ओके असाही मजकूर होता.जेव्हा हा बॅनर राहुल गांधी यांच्याकडे आला तेव्हा त्यांनी या बॅनरकडे कुतूहलाने पाहिले.आज भारत जोडो यात्रेत याच बॅनरची जोरदार चर्चा होती.