मुंबई नगरी टीम
बुलढाणा । राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्यावरून राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे.महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या मुद्द्यावरून भाजपाला घेरले आहे.तर छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांनीही राज्यपालांना हटविण्याची मागणी केली आहे.आता शिंदे गटातील आमदारही या मुद्द्यावरून आक्रमक झाले आहेत.बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी राज्यपालांच्या मुद्द्यावरून शिंदे गट आणि भाजपात वितुष्ठ निर्माण होऊ शकते,असा इशारा देत भाजपाच्या नेत्यांनी छत्रपती शिवरायांबद्दल विचार करून बोलावे, असा सल्ला दिला आहे.
भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी वीर सावकरकर यांच्या मुद्द्यावर सावरकरांनी पाच वेळा माफी मागितली,तसेच पत्र छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला लिहिले होते. असे वक्तव्य केले आहे.छत्रपती शिवाजी महाराजांनी बालसंभाजीसह आग्र्याला औरंगजेबाच्या ज्या दरबारात कोणी मान वर करीत नव्हते. त्या दरबारात ताठ मानेने औरंगजेबाला खडेबोल सुनावण्याचे धाडस दाखवले हे त्या त्रिवेदींनी गोष्ट लक्षात घ्यावी,असेही आमदार गायकवाड यावेळी म्हणाले.भाजपाच्या नेत्यांकडून सारखासारखा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होत असेल तर हे चांगले नाही. अशा प्रकारामुळे यामुळे शिंदे गट आणि भाजपात वितुष्ट निर्माण होऊ शकते.त्याचे परिणाम दोघांनाही भोगावे लागतील, असा गंभीर इशारा आमदार गायकवाड यांनी यावेळी भाजपाच्या नेत्यांना दिला.