मुख्यमंत्र्यांचे विचार सकारात्मक; त्यांच्यात काम करण्याची उर्जा
पतंगराव कदम यांच्याकडून मुख्यमंत्र्यांचे कौतुक
पंढरपूर दि. ६ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे व्यक्तिगत चांगले आहेत. त्यांचे विचार सकारात्मक असुन, त्यांची काम करण्याची ऊर्जा आहे, असे मुख्यमंत्र्यांचे कौतुक माजी मंत्री पतंगराव कदम यांनी करतानाच त्यांनी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी होत नसल्याची खंत व्यक्त केली. मुख्यमंत्री सकारात्मक असले तरी मंत्रिमंडळातील टीम मात्र चांगली नाही, त्यामुळे सरकारची अडचण होत आहे, असेही कदम यांनी स्पष्ट केले.
माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मुलांच्या भविष्यासाठी काँग्रेस पक्ष सोडला असे विधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आ. पतंगराव कदम यांनी करतानात भविष्यात राष्ट्रवादीला काँग्रेसशिवाय पर्याय नाही, असे सूचक विधान त्यांनी केले. ते पंढरपूरमध्ये बोलत होते.राणे आमदार, मंत्री, मुख्यमंत्री झाले तरीही सत्तेचा मोह काही सुटला नाही. मुलांच्या भविष्यासाठी राणे यांनी काँग्रेस पक्ष सोडला, असे कदम यांनी सांगितल. चांगले काम केले तर बाजारात किंमत मिळते. नाहीतर कुत्रेदेखील विचारत नाही, असा टोला लगावत एकदाच मंत्री व्हावे, आयुष्यभर मंत्रिपदाची इच्छा बाळगणे योग्य नाही, असे कदम म्हणाले. राष्ट्रवादी आणि काँग्रेस वेगळे नाही. पवार हे काँग्रेसच्या मुशीत तयार झाले आहेत. विधानसभा निवडणुका एकत्र लढलो असतो तर सत्ता गेली नसती. राष्ट्रवादीला काँग्रेसशिवाय पर्याय नाही असेही कदम म्हणाले.