भाजप सरकार बहिरे आणि आंधळे
खा. नाना पटोलेंचा घरचा आहेर
कोल्हापूर दि. ६ राज्यातील आणि केंद्रातील भाजप सरकार बहिरे आणि आंधळे आहे अशा शब्दात भाजपचे खासदार नाना पटोले यांनी पुन्हा एकदा घरचा आहेर दिला आहे. माझ्यावर पक्षाला जी कारवाई करायची आहे ती त्यांनी करावी असे आव्हान देत , चुका झाल्यावर मी बोलणारच असे नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे.
आज पांचाळ समाजाच्या महाअधिवेशनासाठी खा. पटोले कोल्हापुरमध्ये आले होते त्यावेळी ते बोलत होते.शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरही त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीची घोषणा केली असली सरकार कर्जबाजारी होत चालल्याचे ऐकले आहे. शेतकऱ्यांना बोगस ठरवणाऱ्यांनी गप्प बसलेले बरे असे म्हणत त्यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला. सर्व सामान्य जनतेने भाजपला विश्वासाने मते देवून बहुमताने निवडून दिले, परंतु भाजपने सत्तेवर येण्यापूर्वी दिलेले आश्वासन पाळले नाही. आश्वासने पाळली असती तर विविध प्रश्नांसाठी लोकांना मोर्चे काढावेच लागले नसते अशी टीका पटोले यांनी केली.