मुंबई नगरी टीम
मुंबई । राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजपच्या नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल करण्यात आलेली वक्तव्य तसेच सीमाभागातील गावांवर कर्नाटक सरकारकडून करण्यात आलेला दावा यावर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारकडून बघ्याची भूमिका घेतली जात असल्याने याविरोधात महाविकास आघाडीच्यावतीने येत्या १७ डिसेंबरला मुंबईत जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज केली.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजपच्या नेत्यांकडून काही दिवसात छ.शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधाने करण्यात आली आहेत.तसेच कर्नाटक सरकारने सीमा भागातील गावांवर दावा सांगितला आहे,त्यातच आता गुजरात सीमेवरील राज्यातील गावांकडून गुजरात मध्ये जाण्याची मागणी केली जात असतानाही या सर्व प्रश्नांवर राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार बघ्याची भूमिका घेत असल्याने हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्वपूर्ण बैठक विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या निवासस्थानी पार पडली.या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,विरोधी पक्षनेते अजित पवार,काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात,माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण,राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह महाविकास आघाडीतील अन्य नेते यावेळी उपस्थित होते.त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी येत्या १७ तारखेला राज्यातील शिंदे फडणवीस सरकारच्या विरोधात मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली.हा जिजामाता उद्यान येथून सुरू होवून आझाद मैदान येथे संपेल त्यांनतर महाविकास आघाडीच्या महत्वाच्या नेत्यांची भाषणे होणार आहेत.
राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे गद्दारी आणि कटकारस्थान करून पाडले.शिंदे फडणवीस सरकार कायदेशीर की बेकायदेशीर आहे याचा निकाल अजून लागायचा आहे.मात्र हे सरकार आल्यापासून महाराष्ट्राची सातत्याने अवहेलना होत असून,अपमान आणि फुटीरतेची बीजं टाकण्यात येत आहेत.सीमेवरील काही गाव कर्नाटकात,तेलंगणा आणि गुजरात राज्यामध्ये जायचे म्हणत आहेत.हे आजपर्यंत कधी घडलेले नव्हते असे सांगून,छत्रपतींचा एकसंघ महाराष्ट्र तोडण्याचा प्रयत्न हेतूपुरस्सर होत आहे, असा हल्लाबोल शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपावर केला आहे.राज्यपाल आणि सत्ताधाऱ्यांकडून महाराष्ट्राचा सातत्याने अपमान होत आहे, शिवरायांच्याबद्दल बेताल वक्तव्य केले जात आहे, सीमाभागातील गावांवर कर्नाटकडून दावा केला जात आहे, त्यामुळे महाराष्ट्राच्या अस्मितेला धक्का बसत असल्याचा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला.महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राची अस्मिता,स्वाभिमान धुळीस मिळत आहे.गुजरातची निवडणूक जिंकावी म्हणून महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवले.पुढच्या वर्षी कर्नाटकची निवडणूक असल्याने राज्यातील उद्योग आता कर्नाटकला जाणार का ? असा सवाल करीत राज्यात मुख्यमंत्री आहेत का असा प्रश्न पडत आहे असा टोलाही त्यांनी लगावला.महाराष्ट्राचा अपमान होत असल्याने महाराष्ट्राच्या शक्तीचे विराट दर्शन दाखवले पाहिजे.या मोर्चात सर्वांनी सामिल व्हावे.हा केवळ राजकीय विषय नाही, तर राज्याच्या स्वाभिमानाचा प्रश्न आहे असेही ठाकरे म्हणाले.
राज्यपालांना हटवलं तरी मोर्चा होणारच
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना काही काळात केंद्र सरकार हटविण्याची शक्यता आहे.मात्र केंद्राने राज्यपालांना हटवले तरी येत्या १७ डिसेंबरचा मोर्चा होणारच असा निर्धार राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केला. हा विषय केवळ राज्यपालांच्या वक्तव्याचा नाही तर राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यापासून सीमाभागातील गावांकडून दुसऱ्या राज्यात जाण्याची मागणी केली जात आहे,हे या आधी कधीही घडले नव्हते असे पवार यावेळी म्हणाले. राज्यातील मोठमोठे उद्योग हे गुजरातला जात असल्याने हे या सरकारचे अपयश आहे. आम्ही नवीन उद्योग आणू असे म्हणणाऱ्यांनी जे आहेत ते थांबवावेत असा टोलाही पवार यांनी सरकारला लगावला.कर्नाटकच्या भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी वेगवेगळी वक्तव्ये सुरू ठेवली आहेत.राज्यातील मंत्र्यांना बेळगावात जाण्यापासून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी रोखल्यानंतर राज्यातील मंत्र्यांनी माघार घेतली मात्र त्यांच्याकडून लंगडे समर्थन केले जात असून उभा महाराष्ट्र हे पाहत आहे, असे अजित पवार यांनी सांगून राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना सीमा भागातील गावांच्या विकासासाठी योजना आखण्यात आल्या पण राज्यात शिंदे फडणवीस सरकार येताच त्यांना स्थगिती देण्यात आली असेही पवार म्हणाले.महाविकासआघाडीच्या मोर्चात समाजवादी पक्ष,शेकाप सहभागी होणार असून,येत्या ८ डिसेंबरला मोर्चाच्या नियोजनासाठी सर्वपक्षीय बैठक होणार असल्याची माहिती अजित पवारांनी दिली.