आत्महत्या प्रकरणी पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांविरोधात गुन्हे दाखल करा
मोहन प्रकाश
चंद्रपूर दि. ६ कर्जमाफीच्या घोषणेनंतर महाराष्ट्रात झालेल्या शेतकरी आत्महत्यांना सरकार जबाबदार असून, पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांविरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करा अशी मागणी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी केली आहे. ते चंद्रपूर येथे जनआक्रोश मेळाव्यात बोलत होते.
भाजप सरकारच्या तीन वर्षाच्या अपयशी कारभाराविरोधान महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने राज्यव्यापी जनआक्रोश सप्ताहाचे आयोजन केले आहे. आज चंद्रपूर येथे चौथा जनआक्रोश मेळावा आयोजीत करण्यात आला होता. या मेळाव्याला अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे, माजी मंत्री आ. नसीम खान, विधानसभेतील पक्षाचे उपगटनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते, पदाधिकारी व हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता.
उत्तर प्रदेशात खा. हेमा मालिनींच्या समोर बैल आला म्हणून रेल्वेच्या स्टेशन मास्तरला निलंबित करण्यात आले. पण विदर्भात कीटकनाशक फवारणीमुळे २५ पेक्षा जास्त शेतक-यांचा मृत्यू झाला. तरी सरकारने काहीच कारवाई केली नाही. केंद्रातील आणि राज्यातील सरकार असंवेदनशील आहे. इंदिरा गांधी यांनी बँकाचे राष्ट्रीयीकरण करून सामान्यांना बँकांची दारे खुली केली. पण आता पंतप्रधान नरेंद्र मोदी याच बँकातील पैसे आपल्या उद्योगपती मित्रांना वाटत आहेत अशी टीका मोहन प्रकाश यांनी केली.