मुंबई नगरी टीम
नागपूर । शिंदे -फडणवीस सरकार हे खोके सरकार असल्याची टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे.त्यांच्या या टीकेचा खरपूस समाचार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेत असे शब्द अजित पवार यांना शोभणारे नसून,आम्हाला राज्याचा लवासा करायचा नाही,असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी अजित पवार यांना लगावला.
हिवाळी अधिवेशनाच्या पुर्वसंध्येला मुख्यमंत्री शिंदे यांच्या निवासस्थानी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केलेल्या टीकेचा समाचार घेतला.विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत शिंदे-फडणवीस सरकारवर खोके सरकार असे टीकास्त्र सोडले होते.त्यांच्या या टीकेचा समाचार मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला.अजित पवार यांच्या तोंडून हे शोभणारे नसून,त्यांच्या काळात नियमबाह्य प्रशासकीय मान्यता दिल्या गेल्या मात्र आम्हाला महाराष्ट्राचा लवासा करायचा नाही असा टोला त्यांनी पवार यांना लगावला.आमदनी अट्टनी आणि खर्चा रूपया असा त्यांचा कारभार होता असे सांगून आम्ही ७० टक्के कामावरील स्थगिती उठवली असल्याचे त्यांनी सांगितले.सीमावाद हा अनेक वर्षांचा मुद्दा आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हा मुद्दा गांभीर्याने घेत मध्यस्थी केली हे पहिल्यांदाच घडले आहे.कॅाग्रेसच्या काळात साधी दखलही घेतली गेली नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.महाविकास आघाडीच्या काळात अनेक कामांना स्थगिती देण्यात आली.त्यांनी बंद केलेल्या योजना आम्ही पुन्हा सुरू केल्या,हे सरकार शेतक-यांच्या पाठीशी आहे असे सांगून मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीच्या कालच्या मोर्चावर भाष्य केले.महाविकास आघाडीच्या कालच्या मोर्चापेक्षा रत्नागिरीतील आमच्या सभेला जास्त गर्दी होती अशी खिल्ली त्यांनी उडवली.
नागपूरातील अधिवेशनास कार्यकर्ता म्हणून तर कधी मंत्री म्हणून यायचो आता मुख्यमंत्री म्हणून आलो आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे,धर्मवीर आनंद दिघे, अमित शहा,देवेंद्र फडणवीस आणि आमच्या ५० आमदारांमुळे हिवाळी अधिवेशनाला मुख्यमंत्री म्हणून यायला मिळाल्याचे त्यांनी सांगितले. अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकार घटनाबाह्य असल्याची टीका केली होती.त्याचाही समाचार मुख्यमंत्री शिंदे यांनी घेतला.राज्यात २०१९ स्थापन झालेले सरकार घटनाबाह्य होते.आमचे सरकार कायदेशीर स्थापन झालेले आहे.बहुमत सिद्ध करून स्थापन झाले आहे.त्यांचे सरकार अनैतिक होते,कुणी कुणाशी काय केले हे जनतेला माहित आहे असेही शेवटी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.