सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षे होणार !
मुंबई दि.६ केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षे होण्याची शक्यता आहे. बी.सी. खटुआ अभ्यास समितीने यासाठी अनुकूलता दर्शवली आहे.त्यामुळे येत्या काही दिवसात याबाबतचा निर्णय घेवून राज्य सरकार राज्यातील कर्मचा-यांना भेट देण्याची आशा निर्माण झाली आहे.
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीचे वय ५८ वरून ६० वर्षे करण्यासंदर्भात गठीत करण्यात आलेली बी.सी. खटुआ समिती आपला अहवाल लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करणार आहे. त्यामुळे लवकरच या निर्णयाची घोषणा होणार असल्याची चर्चा आहे. मात्र, विभागिय चौकशी सुरू असलेल्या, वैद्यकीयदृष्ट्या अपात्र ठरलेल्या आणि अकार्यक्षम अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ देऊ नये, असे या समितीने सुचविले आहे. राज्य सरकारने गेल्या वर्षी निवृत्तीचे वय वाढविण्याचा अभ्यास करण्यासाठी माजी सनदी अधकारी बी.सी. खटुआ यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती स्थापन केली होती. राज्यात पावणे दोन लाख पदे रिक्त आहेत. निवृत्तीचे वय वाढल्यास या जागेवरील भरती प्रक्रिया लांबून बेरोजगार तरुणांना याचा फटका बसू शकतो.