मुंबई नगरी टीम
बारामती । छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते तर ते स्वराज्यरक्षक होते असा उल्लेख राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत केला.त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजपने आक्रमक पवित्रा घेत अजित पवार यांच्या विरोधात राज्यभर आंदोलन सुरु केले आहे.या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांना ज्यांना जे म्हणायचे असेल ते म्हणा,ज्यांना धर्मवीर म्हणायचे असेल त्यांनी धर्मवीर म्हणा.ज्यांना संभाजी महाराजांनी स्वराज्याचे रक्षण केले असे वाटत असेल त्यांनी स्वराज्यरक्षक म्हणा,असे भाष्य करून त्यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते तर ते स्वराज्यरक्षक होते असा उल्लेख विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी नागपूरात झालेल्या अधिवेशनादरम्यान विधानसभेत केला.त्यांच्या या वक्तव्यानंतर भाजपने त्यांच्या विरोधात गेल्या दोन दिवसापासून राज्यभर आंदोलन पुकारले आहे.भाजपच्या या आंदोलनामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज बारामतीमध्ये माध्यमांशी संवाद साधला.छत्रपती संभाजी महाराज यांना ज्यांना जे म्हणायचे असेल ते म्हणा ज्यांना धर्मवीर म्हणायचे असेल त्यांनी धर्मवीर म्हणा.ज्यांना संभाजी महाराजांनी स्वराज्याचे रक्षण केले असे वाटत असेल त्यांनी स्वराज्यरक्षक म्हणा असे सांगून अजित पवार हे लवकरच आपली भूमिका मांडणार असल्याचे संकेत दिले.मी ठाण्याला जेव्हा जातो त्यावेळी धर्मवीर म्हणून काही नेत्यांची नावे पुढे येतात.ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एकेकाळचे सहकारी होते,त्यांनाही धर्मवीर म्हटले जाते.तर काही जाहीरातीमध्येही त्यांचा धर्मवीर असा उल्लेख केला जातो.म्हणून धर्मवीर काय किंवा स्वराज्यरक्षक काय ? एखाद्या व्यक्तिची आस्था असते त्यातून तो तसा काही उल्लेख करत असतो असे पवार यावेळी म्हणाले.
छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्यावर हल्ले होत होते त्यावेळी संभाजी महाराजांनी राज्याचे रक्षण करण्याचे महत्त्वाचे काम केले आहे. याची नोंद सर्वांनी घेतली पाहीजे.म्हणून त्यावर वाद घालण्याचे कारण नाही असे शरद पवार यांनी स्पष्ट करीत सध्या सुरू असलेल्या वादावर पडदा टाकण्याचे आवाहन केले.पवार यांनी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेब संदर्भात केलेल्या वक्तव्याबाबतही भाष्य केले.जितेंद्र आव्हाड यांनी केलेले वक्तव्य मी ऐकली नाही.पण अजित पवार यांनी केलेले वक्तव्य मी टिव्हीवर पाहिले होते, म्हणून त्यावर प्रतिक्रिया दिली.कोण आमदार काय बोलत असतील त्या प्रत्येकावर प्रतिक्रिया देणे योग्य नाही असे पवार यांनी सांगून आव्हाड यांच्या वक्तव्यावर बोलणे टाळले.