१५ डिसेंबर पर्यत रस्ते खड्डे मुक्त करणार

१५ डिसेंबर पर्यत रस्ते खड्डे मुक्त करणार

चंद्रकांत पाटील

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतला आढावा

मुंबई,दि ७ महाराष्ट्रातल्या राज्य महामार्ग, राज्यमार्ग,प्रमुख जिल्हा मार्ग या रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे काम वेगाने सुरु असून येत्या १५ डिसेंबर पर्यंत राज्यातील रस्ते खड्डे मुक्त  करणार, असा विश्वास व्यक्त करून यासाठी मंत्रालयातील कार्यालयात वॉर रूम तयार केली असून त्याद्वारे राज्यातील कामांवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

मंत्रालयात खड्डेमुक्त रस्त्यांसाठी उभारण्यात आलेल्या  ‘संपूर्ण  खड्डेमुक्ती वॉर-रूम’च्या पाहणीनंतर पाटील बोलत होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ‘संपूर्ण खड्डेमुक्त वॉर-रूम’चा आढावाही त्यांनी यावेळी घेतला.संपूर्ण राज्यातील खड्डे मुक्तीसाठी वार्षिक देखभाल दुरुस्तीची निविदा काढण्यात येणार आहे. याअंतर्गत प्रत्येक १० किमी रस्त्याची कामे  २ वर्षे कालावधीसाठी संबंधित कंत्राटदारास देण्यात येणार आहे. या कालावधीत या रस्त्याची जबाबदारी त्या कंत्राटदार यांची असणार आहे. राज्यात होणाऱ्या कामांची माहिती ऑनलाईन जिल्हा निहाय तसेच विभाग निहाय या वॉर रूममध्ये अद्ययावत करण्यात येणार  आहे. त्यामुळे खड्डे भरण्याच्या कामाचा आढावा रोजच्या रोज घेतला जाणार आहे. यामध्ये केलेल्या कामाबरोबरच त्याची छायाचित्रे ही अपलोड होत आहेत. त्यामुळे खड्ड्याची स्थिती व खड्डे भरताना आणि भरल्यानंतरची स्थिती ही ही माहिती ऑनलाईन उपलब्ध होणार आहे आहे. त्यामुळे खड्डे भरण्याच्या कामाची रिअल टाईम माहिती मिळणार आहे, असे पाटील यांनी सांगितले.

यावेळी नाशिक व औरंगाबाद येथील कामकाजाचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेण्यात आला. तसेच मुंबई, पुणे, नाशिक औरंगाबाद, अमरावती , नागपूर, येथील राज्य महामार्ग, राज्यमार्ग तसेच प्रमुख जिल्हा मार्ग या रस्त्यांवरील कामकाजाचाही आढावा या बैठकीत घेण्यात आला.

Previous articleठाणे जिल्हा परिषदेसाठी १३ डिसेंबरला मतदान
Next article१७ नगरपरिषदा, नगरपंचायतींसाठी १० आणि १३ डिसेंबरला मतदान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here