१७ नगरपरिषदा, नगरपंचायतींसाठी १० आणि १३ डिसेंबरला मतदान

१७ नगरपरिषदा, नगरपंचायतींसाठी १० आणि १३ डिसेंबरला मतदान

मुंबई, दि. ७ राज्यातील विविध १७ नगरपरिषदा, नगरपंचायतींचे सदस्य व अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी; तसेच जेजुरी नगरपरिषदेचे अध्यक्ष व इतर विविध ठिकाणच्या १० सदस्यांच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी दोन टप्प्यांत १० डिसेंबर व १३ डिसेंबर रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे केली.

सहारिया यांनी सांगितले की, सर्व संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी आणि त्र्यंबक नगरपरिषदेचे सदस्य व अध्यक्षपदांसाठी १० डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्याचा कालावधी १६ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर पर्यंत असेल. नामनिर्देशनपत्रांची छाननी २३ नोव्हेंबर रोजी होईल. न्यायालयात अपील नसलेल्या ठिकाणी २८ नोव्हेंबर तर ; अपील असलेल्या ठिकाणी अपिलाचा निर्णय आल्यानंतर तिसऱ्या दिवसांपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. १० डिसेंबर रोजी मतदान होईल. १२ डिसेंबर रोजी मतमोजणी होईल.
डहाणू, जव्हार, हुपरी, जत, नंदुरबार, नवापूर, तळोदा, किनवट, चिखलदरा, पांढरकवडा व आमगांव या ११ नगरपरिषदांचे सदस्य व अध्यक्षपदांसाठी; तसेच वाडा, फुलंब्री, सिंदखेडा व सालेकसा या चार नगरपंचायतींचे सदस्य आणि अध्यक्षपदांसाठी १३ डिसेंबर रोजी मतदान होईल. नामनिर्देशनपत्रे १८ ते २४ नोव्हेंबर या कालावधीत स्वीकारली जातील. २५ नोव्हेंबर रोजी नामनिर्देशनपत्रांची छाननी होईल. अपील नसलेल्या ठिकाणी ३० नोव्हेंबर पर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. अपील असलेल्या ठिकाणी न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर तिसऱ्या दिवसांपर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. मतदान १३ डिसेंबर रोजी होईल. मतमोजणी १४ डिसेंबर रोजी होईल.

Previous article१५ डिसेंबर पर्यत रस्ते खड्डे मुक्त करणार
Next articleमुंबईतील प्रभाग क्रमांक २१ व ६२ च्या पोटनिवडणुकीसाठी १३ डिसेंबरला मतदान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here