मुंबई नगरी टीम
पुणे । पुणे ही छत्रपती शिवाजी महाराज,चाफेकर बंधू यांची भूमी आहे. या भूमीशी ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांची प्रेरणा आणि आदर्श जोडलेले आहेत.अशा भूमीत लोकमान्य टिळक यांच्या नावाचा पुरस्कार मिळत आहे ते आपले सौभाग्य आहे, विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यभूमीत मिळणारा पुरस्कार हा आपला सन्मान आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
स.प. महाविद्यालय येथे पंतप्रधान मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार, विश्वस्त डॉ. दीपक टिळक, विश्वस्त सुशीलकुमार शिंदे, डॉ. रोहित टिळक, गीताली टिळक, डॉ. प्रणती टिळक आदी उपस्थित होते. स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि एक लाख रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य लढ्याची दिशाच बदलली. देशाची संस्कृती आणि परंपरा महान असल्याचा विश्वास लोकांमध्ये निर्माण केला. देश स्वतंत्र होऊ शकतो हा विश्वास लोकांमध्ये त्यांनी पहिल्यांदा निर्माण केला. देशासमोर सहकार्याचे मोठे उदाहरण ठेवले. स्वातंत्र्य लढ्यातील वर्तमानपत्राचे महत्व ओळखून त्यांनी केसरी आणि मराठा ही वृत्तपत्र सुरू केली. स्वातंत्र्यासाठी इंग्रजांसोबत लढा देतानाच समाजातील वाईट प्रथांविरोधातही त्यांनी लढा दिला.गीतारहस्याच्या माध्यमातून त्यांनी कर्मयोग सोप्या पद्धतीत सांगितला.त्यांचा लोकांवर विश्वास होता.असाच लोकांच्या कर्तृत्वावर प्रामाणिकपणावर आमचाही विश्वास आहे. देशात विश्वासाने भरलेले सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. यामुळेच देश विकासाकडे वेगाने वाटचाल करीत आहे.लोकमान्य टिळकांच्या विचारांमधील देश निर्माण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असे यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले
लोकमान्य टिळकांना समृद्ध, बलाढ्य, कर्तुत्ववान देशाची निर्मिती अपेक्षित होती. त्यासाठी त्यांनी देशामध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण केले. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन अनेक युवकांनी त्याकाळी स्वातंत्र्य संग्रामात सहभाग घेतला. त्यापैकी महत्वाचे उदाहरण म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर हे होत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना इंग्लडला जावून बॅरीस्टर होता यावे यासाठी त्यांना शिष्यवृत्ती देण्याची शिफारसही टिळकांनी केली होती. न्यू इंग्लिश स्कूल, डेक्क्न एज्युकेशन सोसायटी, फर्ग्युसन महाविद्यालयासारख्या संस्थांची स्थापना ही त्यांची दूरदृष्टी दर्शवून देते. या संस्थातून असे कित्येक युवा निघाले ज्यांनी टिळकांचे मिशन पुढे चालवले. राष्ट्रनिर्माणामध्ये आपली भूमिका बजावली. व्यवस्था निर्मितीकडून संस्थांची निर्मिती, संस्था निर्मितीतून व्यक्तीनिर्मिती आणि व्यक्तीनिर्मितीतून राष्ट्रनिर्मिती हे व्हिजन राष्ट्राच्या भविष्यासाठी पथदर्शी असते. त्यावर आज देश प्रभावीपणे वाटचाल करत आहे. देशातील लोकांच्या विश्वासाने आणि प्रयत्नांमुळेच देश आज जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था बनल्याचे मोदी म्हणाले.लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या नावे मिळणाऱ्या पुरस्काराची रक्कम नमामी गंगे प्रकल्पाला देत असल्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी यावेळी केली.
लोकमान्य टिळकांना अपेक्षित देश घडविण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे प्रयत्न
मुख्यमंत्री
यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्यचळवळीचे जनक आणि बहुआयामी प्रतिभावंत होते.त्यांनी दिलेल्या लढ्यामुळे आपण स्वातंत्र्याचा सूर्य अनुभवतो आहे. ते प्रखर राष्ट्रभक्त होते. ब्रिटींशांविरुद्ध लढताना त्यांच्या शब्दांना धार येत होती. लोकमान्य टिळकांना अपेक्षित असलेला देश निर्माण करण्यामध्ये पंतप्रधान मोदी यांचे कार्य महत्वाचे आहे. आज जग एक महत्वाचा नेता म्हणून मोदी यांच्याकडे पाहत आहे.परदेशात त्यांना मिळणारा मान पाहून आम्हा देशवासियांना अभिमान वाटतो.पंतप्रधान मोदी यांना गेल्या ९ वर्षामध्ये आपल्या देशासाठी केलेल्या कामांना लोकमान्यता मिळाली आहे. ते समाजाचे, सामान्य माणसाचे मन ओळखणारे नेते आहेत. त्यांनी देशाची सूत्रे हाती घेतल्यानंतर ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास हे सूत्र ठेऊन देशात सुराज्य निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. हा पुरस्कार म्हणजे त्यांच्या या कामाचा सन्मान आहे. मोठ मोठ्या देशांची अर्थव्यवस्था कोलमडून जात असताना भारताची अर्थव्यवस्था १० व्या क्रमांकावरुन ५ व्या क्रमांकावर आणण्याचे काम पंतप्रधान मोदी यांनी केले आहे.