राष्ट्रवादीच्या चिंतन शिबीरावर उध्दव ठाकरे यांचे टीकास्त्र

राष्ट्रवादीच्या चिंतन शिबीरावर उध्दव ठाकरे यांचे टीकास्त्र

मुंबई दि.८ शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीची चर्चा असतानाच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. कर्जत येथे पार पडलेल्या चिंतन शिबिरावर त्यांनी टीकास्त्र सोडले आहे. राष्ट्रवादीसारख्या पक्षानेही चिंतन शिबिर करावे आणि त्याचे बौद्धिक प्रफुल्ल पटेल यांनी घ्यावे म्हणजेच हा संघ विचारांचा हा पगडा आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. विचारांचा हा पगडा की राजकीय सूतजुळवणी आहे? असा टोलाही लगावला आहे.

आजच्या दै. सामनाच्या संपादकीय मध्ये काय आहे ?

भारतीय जनता पक्षाची किंवा संघ परिवाराची चिंतन शिबिरे होत असत, पण राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेही चिंतन शिबीर कर्जत येथे झाले आहे. त्यामुळे विचारांचा हा पगडा की राजकीय सूतजुळवणी असा प्रश्न राज्यातील जनतेला पडला आहे. भाजपच्या चिंतन शिबिरात संघ परिवारातील ज्येष्ठ मंडळी खास बौद्धिक वगैरे घेण्यासाठी आमंत्रित केली जातात. आता राष्ट्रवादीच्या चिंतन शिबिरात कार्यकर्त्यांना कोणते बौद्धिक मिळाले ते प्रसिद्ध झाले आहे. सध्या श्री. शरद पवारांचे चिंतन सुरू आहे. त्या चिंतनाची दिशा स्पष्ट झाली नसली तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे ‘बौद्धिक प्रमुख’ प्रफुल्ल पटेल यांनी चिंतनाचे तुषार उडवले आहेत. २०१९ मध्ये शरद पवार पंतप्रधान होऊ शकतात असे राष्ट्रवादीच्या बौद्धिक प्रमुखांनी जाहीर केले आहे. यावर राष्ट्रवादीचे ‘सरकार्यवाह’ शरद पवार यांनी अद्यापि कोणतेही मत व्यक्त केलेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून व त्याआधीही शरद पवार हे पंतप्रधानपदाच्या चर्चेत राहिले आहेत. काँग्रेस पक्षात असताना नरसिंह राव, सोनिया गांधी, अर्जुन सिंग वगैरे मंडळींनी पवारांना पंतप्रधान होऊ दिले नाही व सोनिया गांधींच्या विदेशी वंशाच्या मुद्द्यावर काँगेस त्यागाचे चिंतन करूनही राष्ट्रवादीचा खासदारकीचा आकडा आठ-दहाच्या वर गेला नाही. मोदी लाटेमुळे तर तो चारवर गटांगळ्या खात आहे. २०१९ साली तो वाढून किती वाढणार? स्वतः शरद पवार हे वास्तवाचे भान ठेवून पंतप्रधानपदाबाबत बोलत असतात.

Previous articleमुंबईतील प्रभाग क्रमांक २१ व ६२ च्या पोटनिवडणुकीसाठी १३ डिसेंबरला मतदान
Next articleनोटाबंदीमुळे काळा पैसा बाळगणारे नाराज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here