रिक्षा टॅक्सी महासंघाचा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा

मुंबई नगरी टीम

कल्याण । राज्यातील रिक्षा चालकांच्या हितासाठी राज्य सरकारकडून महामंडळ स्थापन करण्यात आले असल्याची माहिती खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे. या महामंडळामुळे रिक्षा चालक आणि त्यांच्या परिवाराचीही जबाबदारी राज्य सरकारची असेल, असेही खासदार शिंदे यांनी सांगितले. कल्याण येथे झालेल्या रिक्षा चालकांच्या मेळाव्यात खासदार श्रीकांत शिंदे बोलत होते. यावेळी कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाच्या वतीने महायुतीचे उमेदवार म्हणून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना जाहीर पाठिंबा देण्यात आला. यामुळे महासंघाशी संलग्न १७ ते १८ हजार रिक्षाचालकांची ताकद महायुतीच्या पाठीशी उभी राहिली असून याबद्दल खासदार शिंदे यांनी रिक्षाचालकांचे आभार मानत भविष्यात भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे सांगितले.

रिक्षाचालक हे खूप कष्ट करून उदरनिर्वाह करतात हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिले आहे. कारण एकनाथ शिंदे साहेबांनी सुद्धा रिक्षा चालवून कुटुंबाचा गाडा चालवला आणि मेहनत करून आज ते राज्याचे मुख्यमंत्री झाले, असे खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले. याप्रसंगी रिक्षाचे परमिट काही वर्षांसाठी बंद करण्याची मागणी रिक्षाचालकांकडून करण्यात आली. यामागणी संदर्भात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर संबंधित विभागाकडे पाठपुरावा करणार असल्याचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले. रिक्षाचालकांच्या समस्या, अडचणी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माहिती आहेत. त्यामुळेच रिक्षाचालकांच्या हितासाठी राज्य सरकारकडून महामंडळ स्थापन करण्यात आले असून या महामंडळाच्या माध्यमातून रिक्षाचालक आणि त्यांच्या परिवारासाठी पॉलिसी आणण्याचे सरकारचे प्रयत्न सुरू आहेत, यापुढे रिक्षाचालक आणि त्यांच्या परिवाराची जबाबदारी, त्यांच्या मुलांचे शिक्षण, वैद्यकीय उपचारांचा खर्च ही सगळी जबाबदारी सरकार घेणार असल्याचे खासदार शिंदे यांनी सांगितले. तसेच भविष्यात राज्यात ई- रिक्षा आणण्याचे प्रयत्न सुरू असून त्यामुळे रिक्षा चालकांचे इंधन, मेंटेनन्स याची बचत होऊन त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल,असेही खासदार शिंदे यावेळी म्हणाले.

कल्याण लोकसभेत १० वर्षांपूर्वी परिस्थिती वेगळी होती. रस्त्यांवर खड्डे होते, ज्यामुळे सर्वाधिक त्रास रिक्षाचालकांना होत होता. मात्र मागील १० वर्षात कल्याण लोकसभेतील सर्व रस्ते खड्डेमुक्त केले असून आता हे रस्ते डांबरमुक्त करून सिमेंट काँक्रीटचे पक्के रस्ते करण्याचे काम सुरू आहे. सध्या कल्याण लोकसभेतील ७० टक्के रस्ते हे सिमेंट काँक्रीटचे करण्यात आल्याची माहिती देखील खासदार शिंदे यांनी यावेळी दिली. तसेच रिक्षाचालकांचा दररोज शेकडो लोकांशी संपर्क येतो. त्यामुळे आपण तर मतदान नक्कीच करावे, परंतु जनतेलाही जास्तीत जास्त प्रमाणात मतदान करण्याचे आवाहन करावे आणि मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. याप्रसंगी कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे अध्यक्ष प्रणव प्रकाश पेणकर, युवासेनेचे सहसचिव प्रतीक पेणकर, शिवसेनेचे कल्याण पूर्व शहरप्रमुख महेश गायकवाड, माजी नगरसेवक निलेश शिंदे, नवीन गवळी यांच्यासह शेकडो रिक्षाचालक उपस्थित होते.

Previous articleराज्य सरकार आणि पालिकेवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा
Next articleकोरोना काळात काँग्रेस व मविआ सरकारचाच उत्तर भारतीयांना मदतीचा हात