कोरोना काळात काँग्रेस व मविआ सरकारचाच उत्तर भारतीयांना मदतीचा हात

मुंबई नगरी टीम

मुंबई । कोरोना काळात केंद्रातील भाजपा सरकारने अचानक लॉकडाऊन लावून जनतेला वाऱ्यावर सोडले. उत्तर भारतातून मुंबईत कामासाठी आलेल्या लोकांचे तर प्रचंड हाल झाले.या कठीण काळात सर्वात आधी काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडी सरकार या समाजाच्या मदतीला धावून आले. कोणीही उपाशी राहू नये यासाठी अन्नधान्य व गरजेचे साहित्य घरोघरी पोहचवले. उत्तर भारतीयांना त्यांच्या गावी जाता यावे यासाठी सोनिया गांधी यांच्या निर्देशानुसार त्यांना गावी पाठवण्यासाठी सर्व सुविधा पुरवल्या परंतु या काळातही भाजपा सरकारने आडमुठेपणाची भूमिका घेतली होती, असा हल्लाबोल उत्तर मध्य मुंबई मतदारसंघाच्या इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रा. वर्षा गायकवाड यांनी केला आहे.

सांताक्रूज येथे झालेल्या उत्तर भारतीय संमेलनात प्रा. वर्षा गायकवाड बोलत होत्या, त्या पुढे म्हणाल्या की, उत्तर भारतीय समाज व काँग्रेस पक्षाचे संबंध नेहमीच गंगा जमुना संस्कृतीसारखे राहिले आहेत. काँग्रेस पक्षानेही उत्तर भारतीयांचा योग्य तो मान सन्मान राखला आहे. मुंबईचे महापौरपद, विरोधी पक्षनेता, मंत्री, आमदार व संघटनेतही महत्वाची जबाबदारी दिली. उत्तर भारतीय समाज मुंबईच्या संस्कृतीत मिसळला आहे. काँग्रेस सरकारने हॉकर्स पॉलीसी बनवून सन्मानाने व्यवसाय करण्याची संधी दिली परंतु कामासाठी मुंबईत आलेल्या या गोरगरिब कष्टकरी समाजावर मनसेने हल्ले केले, मारहाण केली त्याच मनसेबरोबर भारतीय जनता पक्षाने युती करुन उत्तर भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे.

उत्तर भारतीय लोक मुंबईत दुधाचा व्यवसायही मोठ्या प्रमाणात करतात. मुंबईतील जागा एका उद्योगपतीला देण्याचा सपाटा भाजापाने लावला आहे आता त्यांची नजर तबेल्यावरही पडली आहे. दुधावरही जीएसटी लावून लूट केली जात आहे. केंद्रीय मंत्री व भाजपा नेते पियुष गोयल यांनीच कोरोना काळात उत्तर भारतात जाण्यासाठी रेल्वे सोडताना अडवणूक केली. गोयल यांनी मासळीचा वास सहन होत नाही म्हणून ते तोंडावर रुमाल बांधून फिरतात हे लोक तुमच्यासाठी काम करणार आहेत का? सवाल विचारून, भाजपा सरकार हटानी है, काँग्रेस सरकार लानी है, असा नारा वर्षा गायकवाड यांनी दिला.

Previous articleरिक्षा टॅक्सी महासंघाचा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना पाठिंबा
Next articleबीडमध्ये मतदान केंद्रे ताब्यात घेतली, मुस्लिम व मागासवर्गीयांना मतदान करू दिले नाही