उज्वल निकम भाजपाशी संबंधित मग हे प्रकरण दाबले गेले तर ?

मुंबई नगरी टीम

मुंबई । महायुती सरकार एसआयटी सरकार आहे.कोणतीही घटना झाली की लगेच एसआयटीची घोषणा सरकारकडून केली जाते.परंतु कारवाई केली जात नाही.महायुतीची एसआयटी म्हणजे कारवाईचा फार्स आहे.अशा शब्दात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुती सरकारवर टीकास्त्र डागले आहे.त्याचबरोबर बदलापूर प्रकरणात एसआयटी नेमली तरी न्याय मिळेल का ? असा संतप्त करत या प्रकरणी सरकारने उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक केल्याने या नियुक्तीवर वडेट्टीवार यांनी आक्षेप घेतला आहे.

बदलापूर येथील चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ काँग्रेस पक्षाने मंत्रालयावर धडक मोर्चा काढला.पोलिसांनी मोर्चा अडविल्यानंतर महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ महायुती सरकार विरोधात आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.बदलापूर येथील शिक्षण संस्था एका पक्षाशी संबंधित आहे.त्याच पक्षाच्या सबंधित वकिलाची विशेष वकील म्हणून नेमणूक केली आहे.या वकिलाने निवडणूक लढविली आहे.उद्या हे प्रकरण दाबले गेले तर त्याला जबाबदार कोण ? याचे उत्तर सरकारला द्यावे लागेल.सरकार म्हणते विरोधक राजकारण करत आहेत. तुम्हाला लाज वाटत नाही का सरकार म्हणून ? कलकत्ता येथे अत्याचाराच्या घटना झाल्यावर भाजप आंदोलन करते तेव्हा राजकारण नसते का ? आम्ही आंदोलन केले की राजकारण होते का ? असे खडे बोल वडेट्टीवार यांनी सुनावले आहेत.मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात अशा घटना घडत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात ५७ टक्के टक्के गुन्ह्यात वाढ झाली आहे.पण मुख्यमंत्र्यांचे त्याकडे लक्ष नसल्याचे स्पष्ट करत वडेट्टीवार यांनी सरकारच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे.

Previous articleमहाविकास आघाडीकडून २४ ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक
Next article‘शक्ती कायदा’ कधी अंमलात आणणार ? अनिल देशमुखांचा सरकारला सवाल