मुंबई नगरी टीम
मुंबई । काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली भूमिका मांडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडताच भाजपासह अजित पवार यांच्या पक्षाच्या नेत्यांचा जीव भांड्यात पडला.दुसरीकडे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी महायुती सरकारचा शपथविधी केव्हा होणार ? सरकार केव्हा अस्तित्वात येणार ? याची तारीखच सांगितली.
विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ नोव्हेंबरला जाहीर झाला.या निवडणुकीत महायुतीला घवघवीत यश मिळूनही महायुतीचे सरकार स्थापन झाले नाही.देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री व्हावेत अशी मागणी जोर धरू लागली असतानाच, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदावर दावा सांगितल्याने गेल्या चार दिवसात मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर होवू शकला नसल्याने भाजपा आणि राष्ट्रवादीचे नेते चिंतेत होते.त्यातच नाराज असलेले काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ठाण्यातील निवासस्थानी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका जाहीर केली.मुख्यमंत्रीपदाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह जो निर्णय घेतील त्याला समर्थन देणार असल्याचे शिंदे यांनी यावेळी जाहीर केले.शिंदे यांच्या या भूमिकेमुळे भाजपा आणि राष्ट्रवादी नेत्यांना दिलासा मिळाला.दुसरीकडे राज्यात महायुतीचे सरकार केव्हा येणार,नव्या सरकारचा शपथविधी केव्हा होणार याची माहित अजित पवार यांनी दिली.
एकनाथ शिंदे,देवेंद्र फडणवीस आणि मी उद्या गुरूवारी दिल्लीला जाणार आहोत.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी बैठक होणार आहे.उद्या २८ तारीख आहे त्यामुळे येत्या ३० किंवा १ डिसेंबरपर्यंत नव्या सरकारचा शपथविधीचा कार्यक्रम झाला पाहिजे अशी माहिती अजित पवार यांनी दिली.सरकारचा शपथविधी झाल्यावर लगेच नारपूरचे हिवाळी अधिवेशन होईल. या अधिवेशनात पुरवण्या मागण्या मंजूर करून घेणे महत्वाचे आहे.कामाचा ताण वाढणार असला तरी तिन्ही पक्षात अनुभवी नेते असल्याने अडचण येणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कसलीही कटुता न येता खेळीमेळीच्या वातावरणात महायुतीचे मुख्यमंत्री,दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ ठरविले जातील. उद्या होणा-या बैठकीनंतर त्याला अंतिम स्वरुप येईल.दिल्लीतील नेत्यांच्या बैठकीत जो निर्णय होईल त्याला सर्वांचा पाठिंबा असेल असेही पवार यांनी सांगितले.