मुंबई नगरी टीम
मुंबई । यंदा रक्षाबंधन आणि त्याला जोडून आलेल्या चार सुट्ट्यांमुळे प्रवाशी वाहतुकीतून एसटीला १३७.३७ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. विशेष म्हणजे ११ ऑगस्टला एका दिवशी तब्बल ३९ कोटी रुपयांचे उत्पन्न महामंडळाला प्रवासी वाहतुकीतून मिळाले आहे. यंदाच्या आर्थिक वर्षातील हे विक्रमी उत्पन्न आहे.
दरवर्षी एसटीला रक्षाबंधन आणि भाऊबीज या दोन दिवसात विक्रमी उत्पन्न मिळत असते. यंदा रक्षाबंधन आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी एसटीला प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती.रक्षाबंधनच्या आदल्या दिवशी ३०.०६ कोटी रुपये, रक्षाबंधन दिवशी ३४.८६ कोटी व दुसऱ्या दिवशी ३३.३६ कोटी रुपये तर तिस-या दिवशी तब्बल ३९.९ कोटी इतके विक्रमी उत्पन्न एसटीला मिळाले आहे. रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने ४ दिवसात १ कोटी ९३ लाख प्रवाशांनी एसटीमधून सुरक्षित प्रवास केला आहे. त्यामध्ये महिला प्रवाशांची संख्या तब्बल ८८ लाख आहे.