मुंबई नगरी टीम
मुंबई । स्वातंत्र्य दिन हा राष्ट्रीय सण आहे, स्वतंत्र्य दिन व भारतीय जनता पक्षाचा काहीही संबंध नाही. अख्खा देश स्वातंत्र्यासाठी लढत होता तेव्हा भाजपाचे पूर्वज ब्रिटिशांसोबत होते,काहीजण ब्रिटिशांची पेन्शन खात होते, इंग्रजांना मदत करत होते.भाजपाच्या पूर्वजांवरचे हे काळे डाग लपवण्यासाठीच स्वातंत्र्यदिनी कोणी काय खायचे याचे फतवे काढले जात आहेत, असा घणाघाती हल्लाबोल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.
एक देश एक नेता संकल्पना आणून एकच नेता,एकच पेहराव, एकच भाषा आणि एकच खानपान करून देशातील विविधतेतील एकता संपवायची आणि हुकूमशाही आणायची हा भाजपाचा डाव आहे. हिंदू-मुस्लीम वाद तर दररोजच सुरु आहे. आधी मराठा ओबीसी वाद घातला त्यानंतर मराठी हिंदी वाद व आता १५ ऑगस्टला मासांहार करु नये यासाठी फतवा काढला आहे, जनतेवर सर्वप्रकारे सरकारी नियंत्रण आणण्याचा हा प्रकार आहे असल्याचे सपकाळ म्हणाले.भाजपा युती सरकारमध्ये टोळीयुद्ध सुरु आहे, प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला आहे, राज्य दिवाळखोरीत काढले आहे तसेच मतचोरीच्या वास्तवापासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजपा सरकारनेच कबुतर खान्याच्या प्रश्नाला हवा दिली आहे.तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी राज्यात दंगा नियंत्रण पथक स्थापन केले होते पण देवेंद्र फडणवीस यांनी दंगो करो पथक स्थापन केले आहे. हे पथक नागपूर, पुणे, नाशिक, मुंबईमध्ये पाठवून सामाजिक शांतता भंग करत आहे. जैन समाजातील महान संत महावीर यांनी विनय, विवेकता, विनम्रता याची शिकवण दिली आहे, त्याचे पालन होताना दिसत नाही असेही सपकाळ म्हणाले.