अजितदादांनी लाडकी बहीण योजना आणली,त्यामुळे महायुतीला २३८ जागा मिळाल्या

मुंबई नगरी टीम

मुंबई । लाडकी बहीण योजना फसवी आहे.महिलांचा स्वाभिमान १५०० रुपयात विकत घेण्यात आला असा आरोप विरोधक करत आहेत. पण जी व्यक्ती सोन्याचा चमचा घेऊन आली आहे तिला लाडकी बहीण योजना काय समजणार आहे असा टोला लगावतानाच अजित पवार यांनी ही योजना आणल्यानेच महायुतीला २३८ जागा मिळाल्या असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या आढावा बैठकीत केले.

राष्ट्रवादी महिला काँग्रेसची आढावा बैठक महिला विकास मंडळ सभागृहात राज्यातील प्रमुख महिला पदाधिकाऱ्यांचा उपस्थितीत आगामी निवडणुकांसंदर्भात पार पडली.सर्व समाज घटकांतील महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला आहे. हे सांगतानाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार जिथे उभा असेल तिथे अजित पवार यांच्या रुपाने पक्षाची ताकद उभी केली जाईल असे आश्वासन तटकरे यांनी यावेळी दिले. निवडणूक आयोगाकडून नवीन मतदार नोंदणीचे काम सुरूच असते.निवडणुकीसाठी मतदार यादी जाहीर केली जाते.मतदारांकडून हरकती मागविल्या जातात आणि मतदारनिहाय आकडेवारीही जाहीर केली जाते.संबंधित मतदारयादी त्या -त्या पक्षाला निवडणूक आयोगाकडून पाठवली जात असते.त्यावेळी विरोधकांनी हरकत नोंदवायला हवी असते.मात्र विरोधक सध्या महाराष्ट्राला लक्ष्य करत आहे असा हल्लाबोल तटकरे यांनी केला.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीत ५० टक्के जागा महिलांसाठी असतील. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जास्त जागा मिळतील यात शंका नाही. येणारी निवडणूक जिंकायची आहे. विधानसभेत जशा जास्त जागा मिळाल्या आहेत. ते पहाता पुढच्या काळात आपली जबाबदारी वाढणार आहे असेही तटकरे यांनी यावेळी सांगितले. विधानसभा निवडणुकीत मिळालेली आकडेवारी न पहाता मिळालेल्या संधीचा फायदा करुन घेतला पाहिजे असे आवाहन यावेळी खासदार सुनेत्राताई पवार यांनी यावेळी केले.

Previous articleघरे पुढच्या पिढ्यांसाठी सोन्यासारखी गुंतवणूक ; त्यामुळे यातील घर विकू नका
Next articleमुंबईत फक्त मनसे आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचीच ताकद