चंद्रकांत पाटलांना उपसमितीतून हटवा
मराठा क्रांती मोर्चाची मागणी
मुंबई दि. ८ मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गठित केलेल्या उपसमितीचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील हे दिशाभूल करीत असून, चळवळीमध्ये फूट पाडण्याचे काम करीत असल्याचा आरोप करून त्यांना या उपसमितीमधून हटविण्यात यावे अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे. मुंबईत निघालेल्या मोर्चा नंतर सरकारने दिलेले आश्वासन आज पर्यंत पाळण्यात आले नसल्याने येत्या हिवाळी अधिवेशनापूर्वी सरकारने याचा लेखी खुलासा करावा अन्यथा जनआंदोलन छेडण्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने देण्यात आले आहे.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आज पर्यंत राज्यभरात ५८ मोर्चे काढण्यात येवून सरकारला निवेदन देण्यात आले मात्र यावर सरकारने ठोस असे काहीच निर्णय घेतला नसल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने करण्यात आला आहे. मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मंत्र्यांची उपसमिती गठीत करून त्याचे अध्यक्षपद चंद्रकांत पाटील यांना देण्यात आले आहे मात्र पाटील हे वर्तमानपत्राच्या माध्यमातून समाजाची दिशाभूल करीत असून, राज्यातील काही मराठा समाजातील तरूणांना सोबत घेवून मराठा समाजात फूट पाडत असल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिका-यांनी करीत पाटील यांना या अध्यक्षपदावरून हटविण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.
मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने आज सरकारला निवेदन देण्यात आले आहे. मराठा समाजाच्या मागण्यासंदर्भात सरकारने तपशिलवार लेखी खुलासा येत्या हिवाळी अधिवेशनापर्यंत करावा अन्यथा राज्यभर आंदोलन छेडू असा इशारा देण्यात आला आहे.