नोटाबंदीमुळे असंघटित अर्थव्यवस्थेतील पैसा संघटित अर्थव्यवस्थेतील बँकिंग क्षेत्रात आला
मुख्यमंत्री
मुंबई दि. ८ नोटाबंदीच्या वर्षपूर्तीनिमित्त आज भाजपकडून देशभरात ‘काळा पैसा विरोधी दिवस’ साजरा आला. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नोटाबंदीच्या निर्णयाचे समर्थन केले. नोटाबंदीमुळे असंघटित अर्थव्यवस्थेतील पैसा संघटित अर्थव्यवस्थेतील बँकिंग क्षेत्रात आला असे स्पष्ट करताना, नोटाबंदी झाली नसती तर ही रक्कम कधीच सापडली नसती असा दावा त्यांनी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केला.
नोटाबंदी निर्णयापूर्वी साडे पंधरा लाख कोटी रूपयांची माहिती सरकारकडे नव्हती. हे पैसे कोणाकडे आहेत आणि त्याचा उपयोग कशाप्रकारे होत आहेत, याची कोणतीही नोंद नव्हती. मात्र, नोटाबंदीमुळे असंघटित अर्थव्यवस्थेतील पैसा संघटित अर्थव्यवस्थेतील बँकिंग क्षेत्रात आला. नोटाबंदी झाली नसती तर ही रक्कम कधीच सापडली नसती. यापैकी काही रक्कम संशयित असून त्याची तपासणी सुरू आहे. त्यामुळे यामध्ये काळा पैसा सापडल्यास त्याच्यावर करवसुली करणे शक्य होईल, असे फडवणीस यांनी सांगितले. नोटाबंदीमुळे देशात असणारा बेहिशोबी पैसा मोठ्या प्रमाणावर समोर आला. हे पैसे बँक खात्यामध्ये आल्यामुळे त्याचा स्त्रोत कळाला. त्या आधारे आयकर विभागाने कारवाईला सुरूवात केली. या कारवाईदरम्यान आपल्याकडील बेकायदा संपत्ती स्वत:हून उघड करण्याचे प्रमाण सुमारे ३८ टक्क्यांनी वाढले. तर कारवाई करून पकडण्यात आलेल्या बेहिशोबी रक्कमेचे प्रमाण ४१ टक्क्यांनी वाढले. काळा पैसा शोधून काढण्यासाठी राबवण्यात आलेल्या शोध आणि जप्तीच्या कारवाईत एकूण २९ हजार २१३ कोटी रूपये हाती लागल्याची माहितीही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.