वाजले की बारा! व्यंगचित्रातून आ.नितेश राणे यांचा उध्दव ठाकरेंवर प्रहार
मुंबई दि.९ माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे यांनी आपण लवकरच मंत्री म्हणून शपथ घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे.तर राणे यांच्या संभाव्य मंत्रिमंडळ प्रवेशामुळे शिवसेनेने भाजपला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केलेला असतानाच नारायण राणेंचे पुत्र आ. नितेश राणे यांनी या पार्श्वभूमीवर थेट शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर व्यंगचित्राच्या माध्यमातून प्रहार केला आहे.
वाजले की बारा ! या व्यंगचित्राच्या माध्यमातून आ. नितेश राणेंनी यांनी उध्दव ठाकरेंवर टीका केली आहे. राणे यांच्या संभाव्य मंत्रिमंडळ प्रवेश आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट यामध्ये उध्दव ठाकरे यांची झोपच उडाली आहे. अशा आशयाचे व्यंगचित्र राणे यांनी प्रसिध्द करून ठाकरेंवर निशाणा साधला आहे. हे व्यंगचिंत्र स्वत: नितेश राणेंनी काढले आहे. व्हॉट्सअप स्टेट्ससोबतच त्यांनी हे व्यंगचित्र आपल्या ट्विटर अकाउंटवर देखील शेअर केले आहे.
राणे यांचा मंत्रिमंडळात प्रवेश होऊ नये म्हणून शिवसेनेचे गेल्या काही दिवसांपासून जोरदार प्रयत्न सुरु आहेत. पण मुख्यमंत्री फडणवीस राणेंच्या मंत्रिमंडळ प्रवेशावर ठाम आहेत. त्यातच आता नितेश राणे यांनी या व्यंगचित्राच्या माध्यमातून शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे.