येत्या १८ नोव्हेंबरला ठाण्यात “राज गर्जना”
फेरीवाल्यांच्या मुद्दावर काय बोलणार याकडे लक्ष
मुंबई दि.९ रंगशारदा मध्ये झालेल्या पदाधिकारी मेळाव्यात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वाॅर्ड ऑफिसर, स्टेशन मास्तर आणि पोलीस अधिका-यांना फेरीवाला प्रश्नी दिलेल्या इशा-यानंतर येत्या १८ नोव्हेंबरला त्यांची ठाण्यात जाहीर सभा होणार आहे. या सभेच्या माध्यमातून ते फेरीवाल्यांसह विविध प्रश्नांवर आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता आहे.
मनसेच्या भूमिकेमुळे सध्या फेरीवाल्यांचा मुद्दा चांगलाच तापला आहे. एलफिन्स्टन रेल्वे पादचारी पुलावरील दुर्घटनेनंतर रेल्वे स्थानक परिसरात बसणा-या फेरीवाल्यांविरोधात मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मनसेच्या भूमिकेचे सर्वसामान्य जनतेने स्वागत केले आहे. तर ; मुंबईतील अनेक रेल्वे स्थानकांनी मोकळा श्वास घेतला आहे.
मनसेच्या अनधिकृत फेरीवाला हटाव आंदोलनाची सुरूवात ठाणे रेल्वे स्थानक परिसरातून झाली होती. त्यामुळे मनसेची जाहीर सभा ठाण्यामध्येच होणार आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चर्चगेट येथे झालेल्या मोर्चात फेरीवाल्यांना हटवण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली होती. पण त्यानंतरही फेरीवाल्यांनी पदपथ अडविल्याने मनसैनिकांनी रस्त्यावर उतरुन फेरीवाल्यांना हटवले होते. ठाणे महानगरपालिका निवडणुकीनंतर प्रथमच राज ठाकरेंची जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे या सभेविषयी कमालीची उत्सुक्ता आहे.