सेल्फी विथ खड्डे’ च्या मोहिमेत धनंजय मुंडे यांचीही उडी!

सेल्फी विथ खड्डे’ च्या मोहिमेत धनंजय मुंडे यांचीही उडी!

अंबाजोगाई – अहमदपूर रस्त्यावर काढले सेल्फी !

बीड दि.१० राज्यातील खड्ड्यांचे वास्तव चव्हाटयावर आणण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी गेल्या काही दिवसात ‘सेल्फी विथ खड्डे’ ही जोरदार मोहीम उघडली आहे. त्या मोहिमेवरून सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील आणि सुप्रिया सुळे यांच्यात जोरात ट्विटरवाद रंगला आहे. आता या वादात विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांनी उडी घेतली आहे. यामुळे  खड्डे सेल्फी विथ ही मोहीम येत्या काळात बरीच रंगणार आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यातील रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांची सरकार दखल घेत नसल्याने त्या खड्डयांसोबत आपले फोटो काढून ते ट्विटरच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांना पाठवण्याची मोहीम उघडली आहे. या मोहिमेचा पाटील यांनी धसका घेत राज्यातील रस्त्यांवरील खड्डे १५ डिसेंबरपर्यंत बुजविण्याचे आश्वासन दिले. त्याच पार्श्वभूमीवर ‘सेल्फी विथ खड्डे’ ही मोहीम राज्यात मोठ्या प्रमाणात गाजत असताना विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी यात आता उडी मारली असून त्यांनी गुरुवारी अंबेजोगाई ते अहमदपूर या रस्त्यावरून उदगिरकडे जात असताना खड्डयांसोबत सेल्फी काढून त्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांना ट्विटरद्वारे पाठवल्या आहेत.

सुप्रिया सुळे यांनी सुरू केलेल्या खड्डे विथ सेल्फीच्या मोहिमेमुळे मंत्री चंद्रकांत पाटील हवालदिल झाले असून त्यांनी १५ डिसेंबरपर्यंत राज्यातील रस्त्यांवरील खड्डे बुजवले जातील असे आश्वासन दिले आहे. मात्र राज्यात बऱ्याच ठिकाणी खड्डे बुजविण्याच्या नावाखाली माती, मुरूम  टाकण्याचे प्रकार सुरू असून त्या विरोधातही राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात मोठी मोहीम उघडणार असल्याची माहिती राष्ट्रवादीकडून देण्यात आली.

धनंजय मुंडे यांचे दादांना आव्हान
पुन्हा १६ डिसेंबरला ला फोटो काढू

दरम्यान आपण केवळ एका रस्त्याचा फोटो बांधकाम मंत्री यांना पाठवला आहे, हा केवळ एका रस्त्याचा प्रश्न नसून संपूर्ण राज्यातील रस्ते खड्ड्यात गेले आहेत. चंद्रकांत दादा यांनी १५ डिसेंबर पर्यंत खड्डे बुजवण्याची घोषणा केली आहे आम्ही त्यांना १५ डिसेंबर ची मुदत देत असून या कालावधीत खड्डे न बुजल्यास दादांना घेऊन जाऊन त्यांना त्या वेळी सेल्फी नाही तर प्रत्यक्ष खड्डा दाखवू असे आव्हान मुंडे यांनी दिले आहे

Previous articleगुजरात निवडणूकीत सत्ता आणि पैशाचा वापर
Next articleमंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरून तरूण शेतक-याचा आत्महत्येचा प्रयत्न

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here