आ. पाटील यांनी काढली बादशहा शाहरूख खानची खरडपट्टी !
मुंबई दि.११ गेट वे ऑफ इंडीया येथे अलिबाग येथून परतणा-या चित्रपट सृष्टीचा बादशहा शाहरूख खान याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची केलेली गर्दी, त्यामुळे अलिबागला जाण्यासाठी झालेला उशीर यामुळे संतापलेल्या शेकाचे नेते आणि आमदार जयंत पाटील यांनी बॉलिवूड बादशहा शाहरुख खानची चांगलीच खरडपट्टी काढल्याचे समोर आले आहे. आ. पाटील यांचा पारा इतका चढला होता की, त्यांनी या बादशहाला सर्वासमोर खडे बोल सुनावले. आ. पाटील शाहरुखवर संतापल्याचा व्हिडीओ सध्या समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे.
गेल्या आठवड्यात म्हणजेच ३ नोव्हेंबरला शाहरुख खान अलिबाग मधिल आपल्या फार्म हाऊस येथे वाढदिवस साजरा करुन मुंबईला परतत होता. शाहरुख खान आपल्या स्पीड बोटने गेट-वे ऑफ इंडीया येथे पोहचला होता.त्याची एक झलक पाहण्यासाठी या ठिकाणी चाहत्यांची तोबा गर्दी झाली होती. बाहेर मोठ्या प्रमाणात चाहते असल्याने शाहरुख खान बोटीतच बसून राहिला. यामुळे गर्दी वाढत गेली आणि यामुळे इतर बोटींना जाण्यास उशीर झाला. यावेळी शेकापचे आ. जयंत पाटील हे देखील आपल्या स्पीड बोटने अलिबागला चालले होते. परंतु शाहरुख खानमुळे त्यांना अर्धा तास उशीर झाल्याने ते प्रचंड संतापले होते.
समाज माध्यमांवर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत आ. पाटील म्हणतात ‘असशील तू कोणीही मोठा स्टार, पण संपूर्ण अलिबाग काय तुम्ही खरेदी केले का?’ अशा शब्दात त्यांनी शाहरुखला सुनावले. आ. पाटील आपल्या बोटीने पुढे गेल्यानंतर शाहरुख शांतपणे बोटीतून बाहेर पडला.हा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यावर आ.जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली. ‘दिवाळीच्या सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी गरीब लोक गेट-वे ऑफ इंडीया या ठिकाणी येतात. पण गर्दी बघून शाहरुख बोटीतच बसला होता.या ठिकाणी असणारे पोलीस देखील शाहरुखला संरक्षण देण्यात व्यस्त होते यावर मी आक्षेप घेतला. त्याच्या संरक्षणासाठी उगाच लोकांवर काठ्या उगारल्या जात होत्या. माझा सुद्धा हात पोलिसांनी पकडला होता.यावेळी शाहरूख बोटीत बसून सिगरेट पित होता, गप्पा मारत होता. त्याच्यामुळे सगळ्या बोटी थांबल्या होत्या. मलादेखील अर्धा तास उशीर झाला. पोलीस लोकांसाठी आहेत की या अभिनेत्यांसाठी आहेत असा सवाल आ. पाटील यांनी केला.