मंत्रिमंडळ विस्तारावर आजच्या बैठकीत होणार चर्चा ?
आज भाजप कोअर कमिटी बैठक
मुंबई दि.१३ भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक आज रात्री मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी होणार असून, शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना उडालेला गोंधळ त्यामुळे सरकार विरोधी वाढू लागलेली नाराजी, आगामी हिवाळी अधिवेशनातील रणनिती , मंत्रिमंडळाचा विस्तार आदी मुद्यावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी आज रात्री ९ :३० वाजता कोअर कमिटीच्या बैठकीला सुरूवात होणार आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार, शिक्षणमंत्री विनोद तावडे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, माजी मंत्री एकनाथ खडसे आदी नेते या कोअर कमिटीच्या बैठकीला हजर उपस्थित राहणार आहेत.
कर्जमाफी बरोबरच, सध्या विविध मुद्द्यावर सरकार विरोधी वातावरण तयार झाले आहे. तर; सत्तेत सहभागी असणा-या मित्र पक्ष शिवसेनेनेही अनेक मुद्यावर घेतलेली विरोधाची भूमिका, आगामी हिवाळी अधिवेशन, त्याच बरोबर मंत्रिमंडळ विस्तार आणि नुकतेच एनडीए मध्ये दाखल झालेले माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाबाबतही चर्चेची शक्यता आहे. राणे यांच्या संभाव्य प्रवेशावरून शिवसेनेने टोकाची भूमिका घेतल्याने मंत्रीमंडळाचा विस्तार लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. सध्या शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेवरही आज होणा-या बैठकीत चर्चा होणार असल्याचे समजते.