रामराजे निंबाळकरांनी जिहे-कटापूर योजनेचं वाटोळं केलं
आ. जयकुमार गोरेंचा घणाघात
सातारा दि.१४ जिहे-कटापूर योजना पूर्ण करणार, अशा दर्पोक्त्या मारत विधानपरिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर यांच्यासह पालकमंत्री विजय शिवतारे यांनी जिहे-कटापूर योजनेबाबत पोकळ घोषणांचा फुत्कार सोडून प्रसिद्धी गळ्यात मारण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. ही योजना बिघडवण्याचे पाप रामराजे निंबाळकर यांनी केले असून, जिल्ह्यातील पाणी योजनेचे खूप मोठे नुकसान त्यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळात केले असल्यामुळे त्यांना परमेश्वेर सुद्धा माफ करणार नाही, असा घणाघाती टोला माण खटावचे आ. जयकुमार गोरे यांनी लगावला आहे.
आ. गोरे आज येथिल विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. जिहे-कटापूर उपसा सिंचन योजनेला २००७-०८ पर्यंत तुटपूंजा निधी मिळाल्यामुळे या योजनेचे काम रखडलेले होते. मी आमदार झाल्यानंतर २००९ ते २०१३ पर्यंत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळामध्ये या योजनेसाठी सुमारे ८५ कोटी रुपयांचा निधी आणला. विजय शिवतारे हे दोन वर्षापूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री झाले. या कार्यकाळात या योजनेसाठी फक्त ७० हजार रुपये आले आहेत. जिहे-कटापूर जलउपसा जलसिंचन ही मूळ योजना २६९ कोटींची होती ती वाढून ऑक्टोबर २०१७ अखेर ३९३ कोटींची झाली आहे. असे असताना अद्यापही ही योजना पूर्णत्वास येत नाही, ही बाब पालकमंत्र्यांनी झाकून ठेवली आहे. या योजनेला प्रशासकीय मान्यता मिळाली, असे पालकमंत्री सांगतात. परंतू पालकमंत्र्यांनी गेल्या दोन वर्षामध्ये या योजनेसाठी किती निधी हे स्पष्ट करावे, अशी मागणी आ. गोरे केली.
स्वत:ला भगीरथ समजणारे व जिल्ह्यातील पाणी योजनांचे वाटोळे करणारे सभापती रामराजे निंबाळकर यांनी एक्सप्रेस कॅनॉलने जिल्ह्याच्या वाट्यातील पाणी बारामतीला पळवून नेले. हे पाप निंबाळकर यांनीच केलेले आहे. त्यामुळे उगाचच पाण्याच्या प्रश्नावर निवडणुका लढवून जिल्हावासियांची दिशाभूल करु नका अशी टीकाही आ.गोरे यांनी केली. जिल्ह्यातील ७ टीएमसी पाणी इमाने इतबारे बारामतीला पोहोचविण्याचे काम निंबाळकर यांनी केले आहे. जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पाची वेळेत कामे पूर्ण झाली असती तर जिल्ह्यातील पाणी दुस-या जिल्ह्यात पळविण्याची वेळ आली नसती असे आ.गोरे म्हणाले.
दरम्यान, या योजनेबाबत चुकीची माहिती देवून लोकांची दिशाभूल करु नये, या योजनेचे वास्तव लोकांसमोर यावे. ही योजना लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी पालकमंत्र्यांनी प्रयत्न करावेत, असेही यावेळी आ. गोरे यांनी सांगितले. या योजनेला कोणाचे नाव द्यावे, यावरुन काही दिवसांपासून वातावरण तापले आहे. शिवसेनेने या योजनेला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्या, तर भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गुरु लक्ष्मणराव इनामदार यांचे नाव द्या अशी मागणी केली आहे. परंतू ही योजना पूर्ण होण्यासाठी अजून निधीची आवश्यकता आहे. असे असताना फक्त श्रेयवादासाठी सेना-भाजप लढत आहेत.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जर या योजनेला निधी दिला तर त्यांचेही नाव देण्यास काही हरकत नाही. कोणीही उठतो आणि काहीही संबंध नसताना कशाचीही मागणी करतो, असा टोला गोरे यांनी शिवसेना भाजपला लगावला.