नारायण राणेंच्या पराभवासाठी शिवसेना काॅग्रेस राष्ट्रवादी एकत्र येणार ?

नारायण राणेंच्या पराभवासाठी शिवसेना काॅग्रेस राष्ट्रवादी एकत्र येणार ?

मुंबई दि.१५ माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी विधानपरिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने या रिक्त झालेल्या जागेसाठी येत्या ७ डिसेंबरला पोटनिवडणूक होत आहे. नारायण राणे यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये प्रवेश केल्याने त्यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात येणार असली तरी त्यांना हि पोटनिवडणूक अवघड जाण्याची शक्यता आहे. नारायण राणे यांची कोंडी करण्यासाठी शिवसेनेने इतर पक्षांना हाताशी धरून खेळी आखल्याची माहिती समजते. या पोटनिवडणूकीत मोठ्या प्रमाणात घोडेबाजाराला ऊत येवून फोडाफोडीचे राजकारण रंगणार आहे त्यामुळे या पोटनिवडणूकीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

या पोटनिवडणूकीत राष्ट्रवादीने उमेदवार दिल्यास त्याला काँग्रेस आणि शिवसेना पाठिंबा देवून सहकार्य करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे या पोटनिवडणूकीत राणे यांच्या बरोबरच भाजप समोर मोठे आव्हान उभे राहून राणे यांना निवडणुकीत विजय मिळवणे चांगलेच कठिण जाणार असल्याचे चित्र आहे. सध्या विधानसभेत भाजपचे १२२, शिवसेनेचे ६३ , काँग्रेसचे ४२, राष्ट्रवादी ४१, शेकाप आणि बहुजन विकास आघाडीचे प्रत्येकी ३ , अपक्ष ७ एमआयएमचे २ तर; सपा, रासपा,मनसे आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडीयाचे प्रत्येकी एक आमदार आहेत.

भाजपने नारायण राणे यांना उमेदवारी दिल्यास भाजपसह अपक्ष ७ आमदार, आ. हितेंद्र ठाकूर यांची बहुजन विकास आघाडी, मनसे आणि रासपाचा पाठिंबा राणे यांना मिळू शकतो या सर्वांची गोळाबेरीज १३४ होते तर ; राणे यांच्या विरोधी उमेदवाराला काॅग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, शेकाप,एमआयएम, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडीया आणि सपाचा पाठिंबा मिळू शकतो या विरोधी पक्षाच्या आमदारांची संख्या १५१ होत आहे. कांग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर आणि नितेश राणे हे नारायण राणे यांना मतदान करतील, तरीही जिंकण्यासाठी लागणारा १४५ आकडा नारायण राणे यांना  गाठता येणे या आकडेवारीतून अशक्य दिसते.

काँग्रेस ,राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आल्यास त्यांची आकडेवारी १४६ म्हणजे बहुमतापेक्षा जास्त होते.शिवसेना आणि काँग्रेस यांचा राणे विरोध बघता ही पोटनिवडणूक निवडणूक राणे यांना सोपी जाणार नाही असे सध्याच्या राजकीय समीकरणावरून स्पष्ट दिसते.त्यामुळे या निवडणूकीत फोडाफोडीचे राजकारण अटळ असून, मोठ्या प्रमाणात घोडे बाजार होण्याची शक्यता आहे.

Previous articleशैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी ‘शिक्षणाची वारी’
Next articleआ.हर्षवर्धन जाधवांच्या आरोपांची सीबीआय चौकशी करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here