मुख्यमंत्र्यांनी माफी न मागितल्यास नाभिक समाज तीव्र आंदोलन करणार

मुख्यमंत्र्यांनी माफी न मागितल्यास नाभिक समाज तीव्र आंदोलन करणार

जालना दि.१६ पाटस येथिल भीमा शंकर सहकारी साखर कारखान्यांच्या गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाभिक समाजाबद्दल अपशब्द काढून समाजाचा अपमान केला असल्याने मुख्यमंत्र्यांनी समाजाची जाहीर माफी मागावी, अन्यथा येत्या शनिवारी राज्यातील सर्व दुकाने बंद ठेवून नाभिक समाज तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव दळे यांनी दिला आहे.

पाटस येथील भीमा शंकर साखर काखान्याच्या गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावताना ” विरोधकांना अर्धवट कामे करण्याची सवयच आहे.त्यांनी सर्वांना थोड थोड देवून, प्रत्येकाला मलई देवून कामे अर्धवट ठेवली ती सुरू करण्याचे काम आमच्या सरकारने केले असे सांगतानाच ‘एक न्हावी काय करतो, तीन चार ग्राहक बसले असतील तर एकाला लावतो, त्याची अर्धी टाकतो, दुसऱ्याची अर्धी टाकतो, पळून नाही गेला पाहिजे म्हणून तिसऱ्याची शेंडी कापतो.’ असे उदाहरण दिले होते. या वक्तव्यामुळे मुख्यमंत्र्यांनी नाभिक समाजाचा अपमान केला आहे, त्यामुळे त्यांनी नाभिक समाजाची जाहीर माफी मागावी अन्यथा येत्या शनिवारपासून राज्यात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दळे यांनी दिला आहे.

येत्या शनिवारी राज्यातील सर्व दुकाने बंद ठेऊन तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदार व जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन तसेच ठिकठिकाणी अर्धे मुंडन करून आंदोलन करण्यात येणार आहे. शनिवारच्या आंदोलनानंतरही मुख्यमंत्र्यांनी समाजाची माफी न मागितल्यास सोमवार नंतर पुढील आंदोलनाची दिशा ठरविणार असल्याचे महाराष्ट्र नाभिक समाजाचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव दळे यांनी सांगितले.

Previous articleकेंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवलेंना मातृशोक
Next articleमहावितरणच्या ‘ त्या ‘ १७ कर्मचाऱ्यांना पंकजाताई मुंडें यांच्यामुळे मिळाला न्याय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here