महावितरणच्या ‘ त्या ‘ १७ कर्मचाऱ्यांना पंकजाताई मुंडें यांच्यामुळे मिळाला न्याय

महावितरणच्या ‘ त्या ‘ १७ कर्मचाऱ्यांना पंकजाताई मुंडें यांच्यामुळे मिळाला न्याय

बीड दि. १६ महावितरण कंपनीच्या लातूर झोनमध्ये कार्यरत असलेल्या सतरा कर्मचाऱ्यांच्या पगारातून कपात होणाऱ्या अन्यायकारक घरभाडे वसूलीस उर्जामंत्र्यांनी नुकतीच स्थगिती दिली आहे. राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री तथा जिल्हयाच्या पालकमंञी पंकजाताई मुंडे व खा. डाॅ. प्रितमताई मुंडे यांनी त्या कर्मचाऱ्यांची बाजू लावून धरल्याने त्यांना न्याय मिळाला आहे.

बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्हयात महावितरण कंपनीच्या सेवेत असणारे तृतीय व चतुर्थश्रेणी संवर्गातील ५४ कर्मचारी परळी येथे औष्णिक वीज केंद्राच्या शक्तीकुंज वसाहतीत सन २००५ पासून राहत होते. महावितरण कंपनी त्यांच्या निवासी गाळ्याचे भाडे दरमहा त्यांच्या पगारातून कपात करत होते. सन २००५ ते २०१७ पर्यंत कर्मचाऱ्यांच्या पगारातून घरभाडे पोटी कपात झालेली सुमारे दोन कोटी रूपयाची रक्कम महावितरणने महानिर्मिती कंपनीला वर्गच केली नाही, शिवाय महावितरण कंपनीने वसुली देखील चालूच ठेवली होती. असे असताना औष्णिक वीजनिर्मिती केंद्राने कुठलीही पूर्वसूचना न देता कर्मचाऱ्यांना निवासी गाळे रिकामे करण्याची तसेच सन २००५ पासूनचे थकीत घरभाड्यापोटी दोन ते ३६ लाख रूपये पर्यंत दंडाची रक्कम भरण्याची नोटिस पाठवली. अचानक आलेल्या या नोटिशीने कर्मचारी व त्यांचे कुटुंबिय हादरून गेले. अचानक एवढी रक्कम कशी भरायची असा प्रश्न त्यांना पडला. प्रत्यक्षात एकूण ५४ कर्मचारी राहत असताना कोणतीही तपशीलवार माहिती न घेता व रेकाॅर्ड न पाहता केवळ १७ कर्मचा-यांवरच वीजनिर्मिती केंद्राने अशी दंडात्मक कारवाई केली, हे विशेष! ज्या १७ कर्मचा-यांवर ही दंडात्मक कारवाई करण्यात आली होती, ते सर्वजण महावितरणच्या अंबाजोगाई विभागात कार्यरत असल्याने त्यांचेसमोर मोठे संकट उभे राहिले होते.

मुंडे भगिनींनी दिला न्याय

दरमहा पगारातून घरभाडे कपात होऊन सुद्धा स्वतःच्याच कंपनीकडून अन्याय झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट पसरली होती. या सर्व कर्मचाऱ्यांनी पालकमंञी ना. पंकजाताई मुंडे व खा. डाॅ. प्रितमताई मुंडे यांची भेट घेऊन हा सर्व प्रकार त्यांच्या कानावर घातला. खा. डाॅ. प्रितमताई मुंडे यांनी लातूरच्या मुख्य अभियंत्यांना पत्र पाठवून तातडीने वसूली थांबवली तर पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांनी उर्जा मंञी चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा करून सदरहू कर्मचाऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली. यासंदर्भात उर्जामंत्री बावनकुळे यांनी संबंधित कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक नुकतीच मंञालयात घेऊन सतरा कर्मचाऱ्यांच्या अन्यायकारक घरभाडे वसूलीस स्थगिती दिली व तसे आदेश वीज निर्मिती केंद्राला दिले. ना. पंकजाताई मुंडे व खा. डाॅ. प्रितमताई मुंडे यांनी वेळीच हस्तक्षेप करून न्याय मिळवून दिल्याबद्दल कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला असून महाराष्ट्र वीज कामगार महासंघाने मुंडे भगिनींचे आभार मानले आहेत.

Previous articleमुख्यमंत्र्यांनी माफी न मागितल्यास नाभिक समाज तीव्र आंदोलन करणार
Next articleमंत्रालयात प्लास्टिक बाटल्यांवर बंदी !

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here