मुंबईतील टोईंगमध्ये मोठा घोटाळा
मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकाऱ्याच्या निकटवर्तीयाला कंत्राट
संजय निरूपम यांचा आरोप
मुंबई, दि. १७ मुंबईतील अनधिकृत पार्किंगमध्ये उभ्या करण्यात येत असलेल्या गाड्या उचलण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या यंत्रणेचे कंत्राट मुख्यमंत्री कार्यालयातील सचिव प्रवीण दराडे यांच्या जवळच्या विदर्भ इन्फोटेक कंपनीला देण्यात आले असल्याचा आरोप मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम यांनी केला आहे.
मुंबई शहर आणि उपनगरात सुमारे ९ लाख चार चाकी तसेच सुमारे १७ लाख दुचाकी आहेत. गेल्या काही महिन्यांपासून संपूर्ण मुंबईत विदर्भ इन्फोटेक लिमिटेड कंपनीच्या ८० हायड्रोलिक मशीनच्या टोविंग व्हॅन फिरत आहेत. ते नो पार्किंगमध्ये उभी असलेली गाडी तात्काळ हायड्रोलिक मशीन वापरून उचलण्याचे काम करतात. अशा अनधिकृत पार्किंग करणा-या गाड्यांना यापूर्वी मुंबई वाहतूक पोलीसांकडून १०० ते १५० रूपये दंड आकारणी करण्यात येत असे परंतु आता हेच दर ४३० टक्क्यांनी वाढवले गेले आहेत. हे दर चार चाकी गाड्यांसाठी ६६० रूपये आणि दुचाकीसाठी ४२६ एवढे करण्यात आले आहेत. चारचाकी गाड्यांच्या दंडामध्ये सुमारे २०० रूपये मुंबई वाहतूक पोलीसांना म्हणजेच सरकारला मिळतात आणि ४०० रूपये विदर्भ इन्फोटेक लिमिटेड कंपनीला मिळतात त्यामध्ये ६० रुपये वस्त व सेवा कर लावला जातो. दुचाकीच्या दंडामध्येही अशीच आकारणी करण्यात येते.यामध्ये २०० रूपये सरकारला आणि २०० रूपये विदर्भ इन्फोटेक लिमिटेड कंपनीला मिळतात आणि २६ रूपये वस्तु व सेवा कर लावला जातो. याचाच अर्थ यामध्ये विदर्भ इन्फोटेक या कंपनीला मोठा फायदा यामधून मिळत आहे. विदर्भ इन्फोटेक कंपनी नागपूरची असून यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्तीय वरिष्ठ सनदी अधिकारी प्रवीण दराडे यांचा जवळचा संबध आहे, असा संशय येत आहे. दराडे जिथे जिथे जातात त्या त्या विभागाचे काम या कंपनीला मिळते, असा आरोप करत याची सखोल चौकशी करावी अशी मागणी निरूपम यांनी केली.