“हवा तेज़ चलता है दिनकर राव, टोपी संभालो, उड़ जाएगा”….
गुजरात मध्ये राजकीय वातावरण तापू लागले आहे,भाजपचे ‘हु छू’ विकास ‘हु छू’ गुजरात म्हणजेच ‘मी आहे विकास मी आहे गुजरात’ अशी भले मोठे फलक दिसत आहेत. त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी,भाजप अध्यक्ष अमित शाह,मुख्यमंत्री विजय रुपाणी,उपमुख्यमंत्री नितिन पटेल आणि गुजरातचे प्रदेश अध्यक्ष यांच्या प्रतिमा दिसत आहेत, मात्र यापूर्वी गुजरात मधून लोकसभा निवडणूक लढवणारे लालकृष्ण आडवाणी यांचा आणि माजी प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांचा फोटो गायब असल्याचे चित्र आहे. कदाचित मोदी आणि शाह याना वाटत असेल की, या वरिष्ठ नेत्यांच्या नावाने मतं मिळणार नाही म्हणूनच त्याच्या फोटोला फाटा देण्यात आला आहे.
काॅग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधीच्या “नवसर्जन” यात्रेच्या निमित्ताने उत्तर गुजरात मध्ये जाण्याचा योग आला,बनासकाठा,साबर कांठा,पाटण आणि मेहसाणा जिल्ह्यात ही यात्रा फिरत होती,बनासकाठा,साबरकांठा जिल्ह्यात अल्पेश ठाकोर आणि त्याच्या क्षत्रिय ठाकोर सेनेचे प्राबल्य दिसून आले. जागो जागी गळ्यात लाल रंगाचे उपरणे घालून ‘जय माताजी’ ‘जय माताजी’ च्या घोषणा देत त्यांचे स्वागत करत होते,राहुल गांधीची ‘नवसर्जन’ यात्रा ४ टप्प्यात पार पडली. सौराष्ट्र,मध्य गुजरात,दक्षिण गुजरात आणि शेवटी उत्तर गुजरात, पटेल समाजाचे प्राबल्य असलेल्या मेहसाणा जिल्ह्यात राहुल गांधी यांचे भव्य स्वागत झाले गर्दी एवढी की हे स्वागत रोड शो मध्ये बदलले,गर्दी मध्ये सर्वात लक्षणीय गोष्ट म्हणजे पटेल समाजाच्या महिला राहुल गांधीच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरल्या होत्या. जय सरदार, जय सरदार या घोषणा प्रत्येकाच्या तोंडी होत्या, पटेल समाज जेव्हा भाजपा सोबत होता तेव्हा मेहसाणा मध्ये काॅग्रेस आपला फलक लावं शकत नव्हती. कोपरा सभा तर लांबची गोष्ट पण आता त्याच मेहसाणा मध्ये जवळपास एक लाख लोक राहुल गांधीच्या रोड शो आणि सभे मध्ये उपस्थित होते,मेहसाणा हा मतदार संघ गुजरातचे उपमुख्यमंत्री नितिन पटेल यांचा मतदार संघ, राहुल गांधी यांचा रोड शो बघून नितिन पटेल याना पुढच्या महिन्याच्या शेवटी त्यांचे काय होणार याचा अंदाज आलाच असेल,नवसर्जन यात्रेच्या शेवटी विसनगरला राहुल गांधीची सभा झाली ती आता पर्यंतच्या सभा मधील सर्वात मोठी सभा होती,मुख्यमंत्री विजय रुपाणी हे हार्दिक पटेलला काँग्रेसचा एजंट म्हणून हिणवतात, पण काही ही असो या वेळेस पटेल समाज हा भाजपला धडा शिकवणारच,गुजरात मध्ये जवळपास गतप्राण झालेल्या काँग्रेसला २०१५ मध्ये जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुकीत जे यश मिळाले ते पटेल समाजाचा मतांवरच !
गुजरात मध्ये हवा बदलत चालली आहे भाजपच मिशन १५० सुरु आहे. पण ही निवडणुक भाजपला एवढी ही सोपी नाही. हे गुजरात मधील पोरं टोरंही सांगू शकतील,गुजरात मध्ये जर खरोखर विकास झाला आहे तर स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह सुरत शहरात घरोघरी जाऊन पत्रक वाटून मत का मागत आहेत ? हा प्रश्न तेथिल जनता विचारत आहे,सोनिया गांधी असो शरद पवार, की बाळासाहेब ठाकरे या नेत्यांनी दारोदारी जाऊन मतांचा जोगवा कधीच मागितला नाही, तीन दिवस सुरत शहरात फिरताना नोटबंदी आणि जीएसटी मुळे कापड उद्योगाची झालेली वाताहात दिसून येते, २०१२ च्या विधानसभा निवडणुकीत भाजप ने १२ च्या १२ जागा आपल्या खिशात घातल्या होत्या आताच्या निवडणुकीत या १२ मधील ५ जागा भाजपच्या हातून निसटण्याची शक्यता आहे. याचे कारण या ५ मतदार संघात पटेल समाजाचे असलेले प्राबल्य,नोटबंदी आणि जीएसटी मुळे दुखावलेले व्यापारी आतून धुमसत आहेत,जीएसटी विरोधात जुलै २०१७ मध्ये ३७ हजार व्यापा-यांनी १८ दिवस संप केला तेव्हा एकही भाजपचा आमदार,खासदार किंवा मंत्री यांची विचारपुस करावयास फिरकला नाही,गुजरात काॅग्रेस प्रभारी अशोक गेहलोत व्यापारी समुदयाला भेटण्यासाठी आले. पण याच व्यापा-यांनी मोदी, मोदी मोदी घोषणा देवून त्यांना पिटाळून लावले ही त्यांची चूक होती हे व्यापारी आता बोलत आहेत,राहुल गांधीच्या गुजरात दौऱ्यामुळे आणि बदलत्या राजकीय वातावरणामुळे भाजपचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी कित्येक वस्तु वर जीएसटी कमी केला पण कापड व्यापारी वर्गास दिलासा न दिल्याने त्यांच्या पदरी निरशाच पडली, गुजरात मधील लोक म्हणत आहेत की,”गुजरात मे फटी इसलिए जीएसटी घटी”सूरत मधील व्यापारी ३ जुलै २०१७ ही तारीख कधीच विसरू शकत नाहीत. या दिवशी संपकरी व्यापारी वर्गाला पोलिसांनी लाठया काठयानी बडवले.या बाबत एका व्यापा-याची प्रतिक्रिया फार बोलकी होती. तो म्हणाला की मोदी ३० टक्के टक्के मतं घेऊन देशाचे पंतप्रधान झाले. पण त्यांनी हे ही विसरु नये की, देशभरात कापड व्यापारी आणि संबंधित उद्योगाशी जोडलेल्या लोकांची देशभरात १३ टक्के मते आहेत.जीएसटी मुळे नाराज झालेल्या कित्येक कापड व्यापारी जे भाजपचे पदाधिकारी होते, त्यांनी पक्षाच्या पदाचा राजीनामा दिला आणि त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूकीची वाट धरली आहे.
व्यापारी वर्गाची मतं आपल्यालाच मिळतील हा भाजपचा दावा आहे. भाजपचे नेते सांगत आहेत की, “वो रूठेंगे लेकिन टूटेंगे नहीं” हा भाजपचा आत्मविश्वास आत्मघातकी वाटत आहे, सुरत मधील व्यापारी एक वेळेस काँग्रेसला मतदान करणार नाहीत पण भाजपला ही मतदान करण्याची शक्यता कमीच आहे, काँग्रेसची स्थिती या वेळेस सुधारेल हे नक्कीच आहे. पण काॅग्रेसने तिकिट वाटपात घोळ केला की, समजायचे की काँग्रेसला संपवण्यासाठी विरोधकांची गरज नाही, त्यांचे नेतेच हे काम करतील,हार्दिक पटेल यांची रोज नव नवीन कथित सीडी भाजप समोर आणत आहे. त्यामुळे भाजपकडे राहिलेली जी काही पाटीदार मते होती ती ही आता कांग्रेसकडे वळती होत आहेत.
गुजरात मधील २००७ ची विधानसभा असो, किंवा २०१२ ची निवडणूक भाजप आणि काॅग्रेस यांच्या जिंकलेल्या जागा मध्ये फार फरक असेल. पण मतांच्या टक्केवारी मध्ये फार जास्त फरक नाही, २००७ च्या विधानसभा निवडणूकीत भाजपला ४९.१२ टक्के मतं मिळाली तर काँग्रेसला ३९.६३ टक्के,म्हणजेच भाजपला ९.५१ टक्के जास्त मतं मिळाली,२०१२ च्या निवडणुकीत भाजपला ४७.९ टक्के तर काँग्रेसला ३९.९ येथेही ९ टक्के भाजपला जास्त मते मिळाली पण एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे की २००७ आणि २०१२ च्या गुजरात विधानसभा निवडणूकीत पटेल म्हणजेच पाटीदार समाज हा सावली सारखा भाजपच्या पाठी होता. जो या निवडणुकीत सध्या तरी भाजपच्या विरोधात दिसत आहे, ही भाजपसाठी चिंतेची गोष्ट आहे. २०१२ च्या निवडणुकीत मोदी स्वतः मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असूनही मोदी सरकारचे ६ कॅबिनेट मंत्री पराभूत झाले होते. आणि जवळ जवळ ३० विधानसभेच्या जागा भाजपने ५ हजार पेक्षा कमी मतांच्या फरकानी जिंकलेल्या होत्या, गुजरात मध्ये एक एक मत भाजपसाठी महत्वाचे असताना आता शिवसेनेनेही गुजरातच्या तालमीतील माती कपाळाला लावत विधानसभेच्या ५० जागा हिंदुत्व आणि राममंदिर सारख्या ज्वलंत विषयावर लढण्याची तयारी केली आहे,हिंदुत्वाची फॅक्टरी समजल्या जाणाऱ्या गुजरात राज्यात शिवसेना फार मोठा चमत्कार तर नाही करणार पण थोड्या फार जागी भाजपच्या विजयाचे गणित बिघडवू शकते,पद्मावती सिनेमा मुळे गुजरात मधील राजपूत समाज दुःखावला आहे.
काँग्रेसला आणि राहुल गांधींना या निवडणूकीत गमवण्यासारखे काहीच नाही मोदी सरकार केंद्रात आल्यापासुन पंजाब राज्य सोडले तर इतरत्र राज्यामधील विधानसभा निवडणुकीत काॅग्रेसला पराभव सहन करावा लागला आहे. इतकेच काय गुजरातच मधील मागील ४ विधानसभा निवडणुकीत काॅग्रेस पक्षाने सपाटून मार खाल्ला आहे. पण गुजरातच्या निवडणुकीमुळे एक वेगळे राहुल गांधी यावेळेस लोकांना दिसले.
मागील ५ वर्षा मध्ये राहुल गांधीचा समाज माध्यमांमध्ये जो उल्लेख भाजप समर्थक वा कार्यकर्त्यांनी केला त्याच राहुल गांधीचे हेशटॅग ट्विट्सला लोकांची पसंती मिळत आहे,”विकास गांडो थय गयो”,” शाह ज़्यादा खा गया” आणि जीएसटी बाबत केलेले ट्वीट “गब्बर सिंह टैक्स” ला लाखो हिट्स आणि री ट्विट्स मिळाले आहेत.
गुजरात मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० जाहीर सभा घेणार आहेत. यावरून हे स्पष्ट होते की, गुजरातची निवडणूक भाजपला सोपी राहिलेली नाही.गुजरातच्या एकूणच राजकीय परिस्थितीकडे पहिले तर १९९० साली प्रदर्शित झालेला अग्निपथ चित्रपटातील तो संवाद आठवतो,ज्यामधे अमिताभ बच्चन, गोगा कपुरला म्हणतो.
“हवा तेज चलता है,दिनकरराव टोपी संभालो,उड़ जाएगा”
विनोद व्यंकट जगदाळे,
लेखक ,न्यूज़ 24 या राष्ट्रीय वृत्तवाहिनीमध्ये ,महाराष्ट्र ब्यूरो पदावर कार्यरत आहेत.