आज ठाण्यात “राज गर्जना”
राज ठाकरे काय उत्तर देणार याची उत्कंठा
मुंबई दि.१८ एल्फिन्स्टन पुलावर झालेल्या दुर्घटनेनंतर रेल्वे स्थानक आणि परिसरातील फेरीवाल्यांविरोधात आक्रमक पवित्रा घेणारे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज ठाण्यात जाहीर सभा होणार आहे.या सभेला ठाणे स्थानकाजवळ नाकारलेली परवानगी, रंगशारदा येथील पदाधिकारी मेळाव्यात दिलेला इशारा या सर्व पार्श्वभूमीवर ही सभा होत आहे.
या सभेच्या निमित्ताने मनसेच्यावतीने संपूर्ण ठाणे शहरात लावण्यात आलेल्या फलकांवर ‘कोणत्याही प्रश्नाचे उत्तर ‘मनसे’ देईल’ असे म्हटले असल्याने मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे काय उत्तर देणार, याची उत्कंठा लागून राहिली आहे.ठाण्यात मनसेच्या कार्यकर्त्यांनी फेरीवाल्यांना हुसकावून लावले होते. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांची सभा ठाणे स्थानक परिसरातच घेण्याचा मनसेचा इरादा होता. मात्र, सुरक्षेच्या कारणावरून पोलिसांनी या सभेला परवानगी नाकारली होती. त्यानंतर गडकरी रंगायतन जवळील रस्त्यावर सभेसाठी परवानगी देण्यात आली आहे.