मुख्यमंत्र्यांच्या निषेधार्थ नाभिक समाजाचे राज्यभर आंदोलन
जालना दि.१८ पाटस येथिल भीमा शंकर सहकारी साखर कारखान्यांच्या गळीत हंगाम शुभारंभ कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाभिक समाजाबद्दल अपशब्द काढल्याच्या निषेधार्थ नाभिक समाजाने आज दुकाने बंद ठेवून राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि तहसिलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले. मुख्यमंत्री जोपर्यंत नाभिक समाजाची जाहीर माफी मागत नाहीत तो पर्यंत हे आंदोलन सुरू ठेवणार असल्याचा इशारा महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव दळे यांनी दिला आहे.
पाटस येथील भीमा शंकर साखर काखान्याच्या गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावताना नाभिक समाजाचा अपमान होईल असे वक्तव्य केल्याने त्यांनी नाभिक समाजाची जाहीर माफी मागावी अशी मागणी करत, त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी राज्यातील नाभिक समाजाच्यावतीने आज दुकाने बंद ठेवण्यात येवून, विविध जिल्ह्यातील जिल्हाधिकारी आणि तहसिलदार कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांच्या वतीने जिल्हाधिकारी आणि तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले. धरणे आंदोलनादरम्यान नाभिक समाजाच्यावतीने मुख्यमंत्र्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आज संपूर्ण राज्यात हे आंदोलन यशस्वी झाले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजाची माफी न मागितल्यास हे आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दळे यांनी दिला आहे. दळे यांच्या नेतृत्वाखाली जालना येथे नाभिक समाजाने धरणे आंदोलन केले.त्यानंतर जिल्हाधिका-यांना निवेदन देण्यात आले.