राज्यातील ७३४ ग्रामपंचायतींसाठी येत्या २६ डिसेंबरला मतदान
मुंबई, दि.१८ राज्यातील विविध २७ जिल्ह्यांमधील ७३४ ग्रामपंचायतींच्या सदस्यांसह थेट सरपंचपदासाठी २६ डिसेंबर रोजी मतदान होणार असून २७ डिसेंबर रोजी मतमोजणी होईल, असे राज्य निवडणूक आयोगाच्या प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.
जानेवारी व फेब्रुवारी २०१८ मध्ये मुदत संपणाऱ्या आणि नव्याने स्थापित ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आयोगाने हा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यासाठी नामनिर्देशनपत्रे ५ डिसेंबर ते ११ डिसेंबर २०१७ या कालावधीत दाखल करता येतील. नामनिर्देशनपत्रांची छाननी १२ डिसेंबर रोजी होईल. नामनिर्देशनपत्रे मागे घेण्याची अंतिम मुदत १४ डिसेंबर असेल. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. २६ डिसेंबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल; परंतु गोंदिया व गडचिरोली या दोन जिल्ह्यांमध्ये मतदानाची वेळ केवळ दुपारी ३ पर्यंत असेल. २७ डिसेंबर रोजी मतमोजणी होईल.
निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या अशी: ठाणे- ३१, पालघर- ३९, रायगड- ११, रत्नागिरी- १०, सिंधुदुर्ग- १६, नाशिक- २, जळगाव- १००, नंदुरबार- १३, अहमदनगर- ६७, पुणे- ९९, सोलापूर- ६४, सातारा- १९, सांगली- ५, कोल्हापूर- १२, औरंगाबाद- २, बीड- १६२, नांदेड- ४, परभणी- २, उस्मानाबाद- १, लातूर- ५, अमरावती- १३, अकोला- ३, वाशीम- २, बुलडाणा- ४३, वर्धा- ३, गोंदिया- २ आणि गडचिरोली- ४. एकूण- ७३४