मुख्यमंत्र्यांनी विदर्भात नवीन उद्योगांना चालना दयावी
शरद पवार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र
मुंबई दि. २० विदर्भामध्ये मागील काही वर्षात लहानमोठे उद्योगधंदे बंद पडल्याने २० हजाराच्यावर लोक बेकार झाले आहेत. ही बाब चिंताजनक आणि गंभीर असून वाढलेल्या बेरोजगारीमुळे नाराज झालेल्या लोकांचा गैरफायदा नक्षलसारख्या वृत्ती घेवू शकतात त्यामुळे विदर्भामध्ये नवे उद्योग येण्यास चालना देण्याचे काम राज्याचे प्रमुख म्हणून तुमची आहे. असे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी १५ ते १८ नोव्हेंबरला विदर्भाचा दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, वर्धा या जिल्हयांमधील स्थानिकांच्या समस्या जाणून घेतल्या. इथल्या समस्या जाणून घेतल्यावर शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये शरद पवार यांनी चंद्रपूर भागाला भेडसावणारा नक्षल प्रश्न हा केवळ कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न नाही तर त्या परिसराचा आणि परिसरातील लोकांच्या विकासाकडे अधिक लक्ष देणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. चंद्रपूर जिल्हयामध्ये कोळशाच्या खाणी आणि इतर विविध उदयोगातील कामगारांचा मोठा वर्ग आहे. परंतु दुर्देवाने आजमितीस खाणीवरील आणि कारखान्यामधील कामगारांची स्थिती चिंताजनक असल्याचे शरद पवार यांनी पत्रात म्हटले आहे.