जलसंधारणमंत्री राम शिंदे यांना स्वच्छ भारत अभियानाचे महाराष्ट्राचे ब्रँड अम्बॅसेडर नेमा!

जलसंधारणमंत्री राम शिंदे यांना स्वच्छ भारत अभियानाचे महाराष्ट्राचे ब्रँड अम्बॅसेडर नेमा!

काॅग्रेसची टीका

मुंबई दि. २० जागतिक शौचालय दिनालाच स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत महाराष्ट्र हागणदारीमुक्त झाला आहे, असे राज्याचे जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी स्वतःच्या वर्तनाने दाखवून दिलेले आहे. अशी मार्मिक टीका करतानाच राम शिंदे यांना स्वच्छ भारत अभियानाचे महाराष्ट्राकरिता ब्रँड अम्बॅसेडर नेमावे अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे.

राज्यात सरकारकडून न केलेल्या विकासाची मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी सुरु आहे. या अगोदरच नगरविकास विभागातर्फे झालेला विकास दाखवताना बँकॉक चा फोटो दाखवणे, कळवण येथील घर, गॅस आणि वीज नसलेल्या ज्येष्ठ महिलेला शौचालय दिले असे दाखवणे, जलयुक्त शिवार योजनेत समाविष्ट नसलेल्या गावात जलयुक्त शिवारमुळे शेतक-यांना पाणी मिळत असल्याची जाहिरात  करणे, काँग्रेस सरकारच्या काळात राबविलेल्या योजनांच्या लाभार्थ्यांना मिळालेला लाभ आता मिळाला अशा त-हेचे असत्याचे प्रयोग राजरोसपणे सरकार करित आहे. मी लाभार्थी या जाहिरातीत आता राम शिंदे यांचाही समावेश केला तर अधिक संयुक्तिक होईल असे  सावंत म्हणाले.

नुकतेच राज्य हागणदारीमुक्त झालेले आहे असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले होते. राज्याची राजधानी मुंबईच्या अनेक भागात अनेक लोक उघड्यावर शौचास जातात. माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार गेल्या तीन वर्षाच्या या सरकारच्या कार्यकाळात स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत केवळ १ हजार ६२४ शौचालये बांधली गेली. त्यातही अनेक वार्डात एकही शौचालय बांधले गेले नाही. केंद्र सरकारने दिलेला निधीही पूर्णपणे वापरला गेला नाही. दोन वर्षापूर्वी मुख्यमंत्र्यांनी मुंबईत महिलांकरिता ५० हजार शौचालये बांधू अशी घोषणा केली होती. अद्याप यातले एकही शौचालय बांधले गेले नाही. या सरकारचा खोटेपणा रोज उघडकीस येत आहे. यामुळे सरकारची होणारी शोभा पहावत नाही असे सावंत म्हणाले.

Previous articleमुख्यमंत्र्यांनी विदर्भात नवीन उद्योगांना चालना दयावी
Next articleपोटनिवडणूकीसाठी माधव भंडारी यांना उमेदवारी ?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here