पोटनिवडणूकीसाठी माधव भंडारी यांना उमेदवारी ?

पोटनिवडणूकीसाठी माधव भंडारी यांना उमेदवारी ?

मुंबई दि. २०   माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या विरोधात उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेची सुनावणी येत्या २९ तारखेला होणार असून, त्याच दिवशी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख असल्याने भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांना भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.त्याच बरोबर माजी आमदार बाळ माने आणि प्रमोद जठार यांच्या नावाची चर्चा आहे.

नारायण राणे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पोटनिवडणूकीसाठी येत्या ७ डिसेंबरला निवडणूक होत असून, या रिक्त झालेल्या जागेवर राणे यांना उमेदवारी दिली जाईल अशी शक्यता व्यक्त केली जात होती.मात्र पोटनिवडणुकीचे नामांकन दाखल करण्याची अंतिम मुदत २७ नोव्हेंबर असून, त्याच  दिवशी राणे यांच्या विरोधात सक्तवसूली संचालनालयाने सुरू केलेल्या कारवाईचे स्वरूप स्पष्ट होणार आहे. त्यामुळे राणे उमेदवारी दाखल करण्याची शक्यता कमी असून, भारतीय जनता पक्षांच्या दिल्लीतील नेत्यांनी राणे यांना नामांकन अर्ज दाखल न करण्याचा सल्ला दिला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नारायण राणे यांच्या उमेदवारीबाबतचा निर्णय मार्गी लागल्याने आता या जागेवर भारतीय जनता पक्षातून अनेक दावेदार तयार झाले आहेत.विधानपरिषदेची उमेदवारी देण्यात वारंवार डावलण्यात येणारे भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी हे याचे प्रमुख दावेदार मानण्यात येत आहेत. भंडारी यांच्या व्यतिरिक्त भाजपचे माजी आमदार बाळ माने आणि प्रमोद जठार यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे.कॉंग्रेसच्या कोट्यातील हि जागा असल्याने त्या जागेवर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून उमेदवार दिला जाणार नाही. मात्र भारतीय जनता पक्षाच्या घटकपक्षांकडून या जागेवर दावा सांगितला जाण्याची शक्यता असल्याचे सांगितले जाते. नारायण राणे यांनी या जागेसाठी उमेदवारी करणार नसल्याचे संकेत यापूर्वी दिले असल्याने भारतीय जनता पक्षाकडून इच्छूकांमध्ये मोठी स्पर्धा आहे.

जुलै २०१८ मध्ये विधानपरिषदेच्या ११ जागा रिक्त होत असून , अधिवेशनानंतर राणे यांचा मंत्रिमंडळात समावेश करून जुलै मध्ये त्यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिली जावू शकते असे सूत्रांकडून समजते. आगामी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मित्र पक्ष शिवसेना नाराज होवू नये म्हणून हा निर्णय घेतला जावू शकतो अशी शक्यता आहे .जुलै २०१८ मध्ये काॅग्रेसचे माणिकराव ठाकरे, संजय दत्त, शरद रणपिसे, राष्ट्रवादीचे जयदेव गायकवाड, नरेंद्र पाटील, अमरसिंह पंडीत, सुनिल तटकरे, भाजपचे विजय गिरकर, भाजप मित्र पक्षाचे महादेव जानकर, शिवसेनेचे अनिल परब आणि शेकापचे जयंत पाटील हे निवृत्त होत आहेत.

Previous articleजलसंधारणमंत्री राम शिंदे यांना स्वच्छ भारत अभियानाचे महाराष्ट्राचे ब्रँड अम्बॅसेडर नेमा!
Next articleअमोल यादव यांच्या विमानाला ‘डिजीसीए’कडून नोंदणी प्रमाणपत्र

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here