अमोल यादव यांच्या विमानाला ‘डिजीसीए’कडून नोंदणी प्रमाणपत्र

अमोल यादव यांच्या विमानाला ‘डिजीसीए’कडून नोंदणी प्रमाणपत्र

मुंबई, दि. २० वैमानिक अमोल यादव यांनी बनविलेल्या ‘टीएसी ००३’ या विमानाची नोंदणी करुन तसे प्रमाणपत्र नागरी हवाई वाहतूक महासंचालनालय (डिजीसीए) यांनी प्रदान केले आहे. यामुळे स्वदेशी विमानाची निर्मिती करण्याच्या यादव यांच्या स्वप्नाची पूर्ती होणार आहे. या नोंदणीसाठी कसोशीने पाठपुरावा केल्याबद्दल यादव यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आभार मानले आहेत.

वैमानिक अमोल यादव यांनी कांदिवलीतील चारकोप येथील घराच्या गच्चीवर २०११ मध्ये विमान बनविले. मुंबईत मेक इन इंडिया सप्ताहात हे विमान प्रदर्शित करण्यात आले होते. यादव हे त्यांच्या थ्रस्ट इंडिया कंपनीमार्फत महाराष्ट्रात विमानांची निर्मिती करणारा उद्योग उभा करणार आहेत. यादव यांची कल्पकता व भारतीय बनावटीचे विमान बनविण्याचा त्यांचा संकल्प पाहता राज्य सरकारने यादव यांच्या कंपनीस संपूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले होते.

विमान निर्मिती करण्यासाठी यादव यांच्या विमानाची केंद्र शासनाच्या नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाकडे नोंदणी होणे आवश्यक होते. मात्र, या प्रक्रियेत अनेक अडथळे येत असल्याने मुख्यमंत्र्यांनी त्यासाठी जातीने पुढाकार घेतला होता. त्यांनी याबाबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले होते तसेच त्यांच्याशी चर्चाही केली होती. सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर या प्रयत्नांना यश मिळाले असून डीजीसीएने यादव यांच्या विमानास नुकतेच नोंदणी प्रमाणपत्र प्रदान केले आहे. या संपूर्ण प्रक्रियेतील सहकार्याबद्दल आभार मानण्यासाठी श्री. यादव यांनी आज मंत्रालयात येऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यांच्या पाठपुराव्यामुळेच संपूर्ण भारतीय बनावटीचे विमान बनविणारी पहिली खासगी कंपनी उभारण्याचे आपले स्वप्न साकार होणार असल्याचे त्यांनी कृतज्ञपणे सांगितले.

Previous articleपोटनिवडणूकीसाठी माधव भंडारी यांना उमेदवारी ?
Next articleमराठवाड्याच्या विकासाबद्दल सरकारची  अनास्थाच

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here