मराठवाड्याच्या विकासाबद्दल सरकारची अनास्थाच
धनंजय मुंडे यांचा आरोप
बीड.दि.२० मागील वर्षी औरंगाबाद येथे झालेल्या मंत्री मंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या ३० पैकी १३ निर्णयांवर अद्याप काहीच कार्यवाही झाली नसल्याचे आज सरकारने घेतलेल्या आढावा बैठकीत मान्य केले आहे. यावरूनच सरकारची मराठवाड्याच्या विकसाबद्दल अनास्था दिसुन येते अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे.
मागील वर्षी औरंगाबाद येथे झालेल्या मंत्री मंडळ निर्णयांची तातडीने अंमलबजावणी करावी, प्रतिवर्षा प्रमाणे या ही वर्षी राज्य मंत्री मंडळाची विशेष बैठक औरंगाबाद येथे तात्काळ आयोजित करण्याची मागणी धनंजय मुंडे यांनी ९ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र पाठवुन केली होती. या पत्राच्या अनुषंगाने आज मुंबईत सरकारने आढावा बैठक घेतली. मात्र या बैठकीत मागील वर्षी घेतलेल्या ३० पैकी १३ निर्णयांवर अद्याप कोणतीच कारवाई झाली नसल्याचे खुद्द सरकारनेच मान्य केले आहे. यावरूनच सरकारची मराठवाड्याच्या विकासाबाबतची अनास्था दिसुन येत असल्याचे मुंडे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. स्व.गोपीनाथराव मुंडे यांच्या राष्ट्रीय ग्रामविकास संस्थेला जाहिर केलेला ३ कोटी रूपयांचे अनुदानही सरकारला वर्षभरात देता येऊ नये ही शोकांतीका असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सरकारने किमान आपल्या पत्राची दखल घेवुन बैठक घेण्याचे सौजन्य तरी दाखवले असा टोला ही त्यांनी लगावला आहे.
मागील वर्षीच्या बैठकीतील सर्व निर्णयांची तातडीने अंमलबजावनी करावी तसेच या वर्षी ही मराठवाड्याच्या विकासासंदर्भात राज्य मंत्री मंडळाची विशेष बैठक औरंगाबाद येथे तातडीने घ्यावी या मागणीचा पुनरुच्चारही त्यांनी केला आहे.