येत्या १२ डिसेंबरला काॅग्रेस राष्ट्रवादीचा अधिवेशनावर विराट मोर्चा
मुंबई दि.२१ राज्यातील भाजप-शिवसेना सरकारविरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस येत्या १२ डिसेंबर रोजी नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढणार आहेत. काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनिल तटकरे यांनी आज येथे माहिती दिली.
राज्य सरकारच्या विरोधात काॅग्रेस पक्षाने राज्यभर जनआक्रोश मोर्चा काढला होता. तर राष्ट्रवादीने हल्लाबोल मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. वेगवेगळे मोर्च काढण्याऐवजी दोन्ही काॅग्रेस एकाच वेळी येत्या १२ डिसेंबरला हिवाळी अधिवेशनावर मोर्चा काढणार आहे.
याबाबत चर्चा करण्यासाठी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मंत्रालयासमोरील शासकीय निवासस्थानी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीला कांग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण, विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील, माणिकराव ठाकरे, शरद रणपिसे, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, जयंत पाटील उपस्थित होते. या बैठकीत अधिवेशनावर एकत्रित मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती खा.चव्हाण आणि आ. तटकरे यांनी दिली.